महाराष्ट्र एका अभ्यासू नेतृत्वाला मुकला : बापट
मुंबई : मंत्रिमंडळातील माझे सहकारी पांडुरंग फुंडकर यांचे निधन झाले यावर विश्वास बसत नाही. त्यांचे असे अचानक जाणे मनाला चटका लाऊन जाणारे आहे. अशा शब्दात राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरिष बापट यांनी फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
कृषी व फलोत्पादन मंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. विरोधी पक्ष नेते, आमदार, खासदार, तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पार पडल्या. भारतीय जनता पक्षाच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका अभ्यासू नेतृत्वाला मुकला आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना, मित्र परिवाराला, तसेच कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो असेही बापट यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.