एसटीची ३० टक्के दरवाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव
अंतिम निर्णय एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष घेणार
मुंबई : डिझेलच्या वाढत्या किंमती,कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे येणारा आर्थिक बोजा, वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती तसेच महामार्गावरील टोल दरामध्ये झालेली वाढ लक्षात घेता, एस.टी. प्रशासनाने ३० टक्के तिकीट दरवाढीचा प्रस्ताव एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष यांचेकडे सादर केला आहे.
एस.टी. प्रशासनाने आपोआप भाडेवाढीच्या सुत्रानुसार इंधन दरात झालेली वाढ, भविष्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनकराराच्या अनुषंगाने येणारा आर्थिक बोजा, वाहनांच्या सुट्या भागाचे वाढलेले दर या घटकांचा विचार करुन एस.टी. चे तिकीटदर ३० टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षांना सादर केला आहे.याबाबत स्पष्टीकरण देतांना डिझेल दरवाढीमुळे सुमारे ४७० कोटी रुपये अतिरिक्त रक्कम खर्च होणार असून तितकीच रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी तरतूद करणे अपेक्षित आहे. याचबरोबर वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती व महामार्गावरील टोल दरात झालेली वाढ यामुळे तब्बल दोन हजार दोनशे कोटी रुपये संचित तोटा सहन करणाऱ्या एस.टी.महामंडळाला नाईलाजास्तव ३० टक्के भाडेवाढ करणे अगत्याचे आहे. त्यानुसार सदर भाडेवाढीचा प्रस्ताव एस.टी.महामंडळाच्य अध्यक्षांकडे सादर केला असून त्याबाबत अंतिम निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष घेणार आहेत.