कोकण पदवीधरमध्ये शिवसेना आणि भाजपा सामना रंगणार
मुंबई : पालघर लोकसभेच्या पोटनिवडणूकीच्या संघर्षानंतर आता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या येत्या २५ जून रोजी होणा-या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपामध्ये सामना रंगणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपने राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देवून पक्षात प्रवेश केलेले निरंजन डावखरे यांना तर शिवसेनेने ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
मुंबई,कोकण पदवीधर विभाग आणि मुंबई, नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघासाठी येत्या २५ जून रोजी मतदान होणार आहे. आमदारकीचा आणि राष्ट्रवादीचा राजीनामा देणारे निरंजन डावखरे यांना भाजपाने कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. निरंजन डावखरे हे यापूर्वी या मतदारसंघातून विधान परिषदेत निवडून गेले होते. शिवसेना आणि भाजपात युती असल्याने गेल्या निवडणूकीत निरंजन डावखरे यांचा विजय सुकर झाला होता. मात्र शिवसेनेने यापुढील निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा करून त्यांनी पालघरच्या लोकसभा निवडणूकीत झलक दाखवून दिल्यानंतर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार देण्याचा निर्णय घेत ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसते.गेल्या निवडणूकीत निरंजन डावखरे यांनी भाजपच्या संजय केळकर यांचा पराभव केला होता. डावखरे यांनी भाजपात प्रवेश केल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीने तगडा उमेदवार देण्याची तयारी केली असतानाच शिवसेनेने संजय मोरे यांना रिंगणात उतरवले आहे. पालघर नंतर शिवसेना आणि भाजपा या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत.