सहकारमंत्री सुभाष देशमुखांना मंत्रीपदावरुन दूर करा

सहकारमंत्री सुभाष देशमुखांना मंत्रीपदावरुन दूर करा

धनंजय मुंडे यांची मागणी

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील अजून एक मंत्री अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापुरात असणारा बंगला हा बेकायदेशीर असल्याचा अहवाल महानगरपालिका आयुक्तांनी दिला आहे. तर या प्रकरणी जो न्याय एकनाथ खडसे यांना दिला तोच देशमुख यांना लावून त्यांना मंत्रिपदावरून दूर करावे अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभाग आणि व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित असलेल्या  या बंगल्यावरून वाद सुरु होता. विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी हा प्रश्न अधिवेशनात लावून धरला होता.आता महानगरपालिकेच्या अहवालात हा बंगला वादग्रस्त असल्याचे स्पष्ट झाल्याने या वादग्रस्त बंगला बांधकाम प्रकरणी सहकारमंत्री देशमुख अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात बांधण्यात आलेला हा बंगला महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभाग आणि व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर आहे, असे अहवालात म्हटले आहे. २६ पानी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे.या अहवालात बंगल्याच्या बांधकामावर अनेक आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर येथील बेकायदेशीर बंगल्या प्रकरणी जो न्याय खडसे यांना दिला तोच देशमुख यांना लावून त्यांना मंत्रीपदावरुन दूर करावे अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.तसेच हे
बांधकाम जमीनदोस्त करावे असेही मुंडे म्हणाले.मागील एक वर्षांपासून आम्ही सभागृहात आणि सभागृहाबाहेर हा विषय लावून धरला आहे. आगामी काळातही हा विषय लावून धरू असे स्पष्ट करतानाच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. आता सत्य बाहेर आल्याने देशमुख यांच्यावर कारवाई करणार का , नेहमी प्रमाणे कारवाई करणार असा सवाल उपस्थित करत हा विषय न्यायालयात गेला नसता तर सरकारने कधीच न्याय दिला नसता अशी टीका त्यांनी केली.

Previous articleएसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३२ ते ४८ टक्के  वाढ
Next articleसंविधानाचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेला अटक करा : आठवले