छत्रपती म्हणून नव्हे तर मुंडे साहेबांचा मुलगा म्हणून आलोय-खा.उदयनराजे भोसले

 

छत्रपती म्हणून नव्हे तर मुंडे साहेबांचा मुलगा म्हणून आलोय-खा.उदयनराजे भोसले

दोन्ही छत्रपतींची ताकद मुंडे भगिनींच्या पाठीशी- खा.संभाजीराजे भोसले

शेवटचा श्वास असेपर्यंत जनतेची सेवा – ना. पंकजाताई मुंडे

परळी :  कुठलाही राजकीय वारसा अथवा संपत्ती नसतांना हिंमत आणि आत्मविश्वासाच्या बळावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी नाथ्रा ते युनो असा प्रवास करून आपले नेतृत्व सिध्द केले आहे. त्यांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पुर्ण होेवु शकणार नाही त्यामुळेच ते लोकोत्तर लोकनेते होते असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मी छत्रपती म्हणून नव्हे तर मुंडे साहेबांचा मुलगा म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे छत्रपती खा.उदयनराजे भोसले यांनी सांगितले तर  दोन्ही छत्रपतींची ताकद लोकनेते  मुंडे साहेब यांच्या कन्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही छत्रपती खा.संभाजीराजे भोसले यांनी दिली. आज मुंडे साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथगडावर अभिवादन करण्यासाठी मंत्री, आमदार, खासदारांसह अलोट जनसागर उसळला होता.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज गोपीनाथ गडावर विविध सामाजिक उपक्रम तसेच कर्तृत्ववान व्यकींचा गौरव करण्यात आला आजचा दिवस सामाजिक उत्थान दिन म्हणूनही साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गोपीनाथगडावर प्रचंड गर्दी जमली होती. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती खा. उदयनराजे भोसले, छत्रपती  खा.संभाजीराजे भोसले, जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर,राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मंत्री विजय देशमुख, दिलीप कांबळे, पाशा पटेल,  आ.सुरजितसिंह ठाकूर, आ.भीमराव धोंडे,आ.आर टी देशमुख,आ.मोनिका राजळे, आ. शिवाजीराव कर्डिले, आ.बाबुराव पाचर्णे, आ.तानाजी मुटकुळे, आ. सुधाकर भालेराव,आ.संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार, प्रवीण घुगे,विजय पुराणिक, माजी मंत्री सुरेश धस, केशवराव आंधळे, विजय गव्हाणे, प्रकाश महाजन,अशोक सामत, प्रताप पाटील चिखलीकर, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, आदित्य सारडा,भागवत कराड, भाऊराव देशमुख,गणेश हाके, रत्नाकर गुट्टे, सहाल चाउस, स्वरूपसिंह हजारी, ह.भ.प. राधाबाई सानप, आदिनाथ नवले, विजयराज बंब, आदींसह मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खा. उदयनराजे यांचे स्वागत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी तर खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी खा. संभाजीराजे यांचे तुळशी वृंदावन व स्मृतिचिन्ह  देऊन  स्वागत केले.कार्यक्रमास श्रीमती प्रज्ञाताई गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अ‍ॅड. यशश्री मुंडे,  डॉ.अमित पालवे, गौरव खाडे, आर्यमान पालवे, अगस्त्य खाडे आदी मुंडे कुटूंबिय उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंडे साहेबांनी आयुष्यभर उपेक्षितांसाठी लढा दिला. पक्ष व पक्षातित सलोखा आणि सर्व समाज घटकांशी एकरूप होऊन गेलेला लोकोत्तर लोकनेता अशी राजकारणातील अपवादात्मक गुणविशेषता असणारे व्यक्तीमत्व म्हणजे गोपीनाथराव मुंडे हे आहेत. वंचित -पिडीतांचा खराखुरा स्वाभिमान व संघर्ष बनलेल्या  गोपीनाथ मुंडे  या नावाशिवाय महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असे फडणवीस म्हणाले. भाजपातील माझ्यासह असंख्य कार्यकर्त्यांची जडणघडण गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांच्या विचारानेच राज्यात सरकार वाटचाल करीत आहे. माझ्या राजकीय वाटचालीत सभागृहात व सभागृहाबाहेर खंबीरपणे उभे राहणारे नेते गोपीनाथ मुंडे हे होते. स्वहिंमत, प्रचंड आत्मविश्वास, आक्रमक व तितकेच प्रेमळ असे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू आहेत. वंचितांचे खर्‍या अर्थाने नेते, त्यांचा स्वाभिमान असणारा असे हे नेतृत्व पुन्हा होणे नाही. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना त्यांनी संघटीत गुन्हेगारी नेस्तनाबूत केली. राजकारणातील गुन्हेगारीवर आक्रमकपणे प्रहार केला. एवढेच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी असलेल्या सहकार क्षेत्रात ही मुंडे साहेबांनी स्वतःची ओळख निर्माण केली. सहकारात काम करताना ते साखर सम्राट झाले नाहीत तर ऊसतोड मजूरांचे नेते म्हणूनच वावरले ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या सेवेचा आणि संघर्षाचा वारसा त्यांच्या कन्या ना.पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे या अतिशय समर्थपणे चालवित असुन त्यांनी ही राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंडे साहेबांचे विचार समोर ठेवूनच सरकार काम करत असल्याचे ते म्हणाले.

मुंडे साहेब वडिलांसमान – खा.उदयनराजे

यावेळी बोलताना, खा.छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की गोपीनाथराव मुंडे लोकराजा होते. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. मुंडे साहेब केवळ मार्गदर्शक व मित्र नव्हते तर मला वडिलांसमान होते. त्यामुळे याठिकाणी मी छत्रपती म्हणून नाहीतर त्यांचा मुलगा म्हणून आलो आहे. कधीही हाक मारा साथ द्यायला तयार आहे असा शब्द देत मी कालही तुमचा होतो, आजही तुमचा, भविष्यात काहीही बदल होणार नाही असे सांगत त्यांनी साहेबांच्या अनेक आठवणींना  उजाळा दिला. त्यांच्यामुळेच मला मंत्रीपदाची संधी मिळाली हे सांगायला ही ते विसरले नाहीत. कॉलर टाईट करण्याच्या आपल्या स्टाईलचे त्यांनी पुन्हा एकदा समर्थन करून जनतेची कामे करण्यासाठी त्यांनीच कॉलर टाईट करायला शिकवले असे ते म्हणाले. जनतेच्या पाठींब्यामुळे मी हे करीत असुन त्यामुळे कोणाला त्रास होत असेल तर होवु द्या मी माझी स्टाईल सोडणार नाही असे ही ते म्हणाले.

दोन्ही छत्रपतींची ताकद मुंडे भगिनींच्या पाठीशी- खा.संभाजीराजे

यावेळी बोलताना, छत्रपती खा. संभाजीराजे भोसले म्हणाले की मुंडे साहेबांच्या कोणत्याही कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रणाची गरज नाही. तो आमचा हक्क असून केवळ बहिणीसाठी हक्काने आलो आहे. कधीच एकत्र न येणारे आम्ही दोन्ही राजे केवळ मुंडे साहेबांमुळे आज एका व्यासपीठावर आलो आहोत.   मुंडे भगिनींच्या मागे दोन्ही छत्रपतींची ताकत आहे असा शब्द त्यांनी यावेळी दिला.

शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्यांची सेवा करेल – ना. पंकजाताई मुंडे 

आजचा दिवस साजरा करावा असे आपल्याला कधीही वाटले नाही, मुंडे साहेबांनी आपल्याला कधीही रडायला नाही, तर सतत लढायला शिकवले. व्यासपीठावरील सर्व दिग्गज मान्यवर मंडळींमुळे मला आज मी खूप ताकदवान असल्याचं सतत वाटतं आहे.
तीन जुन उजाडला की माझे मन सुन्न होते. तो दिवस मला आजही आठवतो आणि माझे मन गंभीर होते. नियतीनेच मुंडे साहेबांवर वार केले अन्यथा ती ताकद कोणातही नव्हती. आज गोपीनाथगडावर उभे असलेले मुंडे साहेबांचे स्मारक हे आम्हा सर्वांसाठी ऊर्जेचा स्रोत असून, हे स्मारक आम्हाला सतत प्रेरणा देत. मुंडे साहेबांनी शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्षयात्रा काढून महाराष्ट्रातील तळागाळातील माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचाच विचार घेऊन मी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन संघर्षयात्रा काढली आणि राज्यात सत्ता परिवर्तन झालं. आज आम्ही सरकारमध्ये असतांना मुंडे साहेबांचे विकासाचे विचार घेऊन काम करतो आहोत. आज देशामध्ये परिवर्तन होत आहे, मुंडे साहेबांचं स्वप्नं होतं दिन, दलित, दुबळ्या जणांचे कल्याण व्हावे म्हणून त्यांनी आपले आयुष्य झिजवले. त्यांच्यामुळे आम्ही आज हा दिवस सामाजिक उत्थान दिवस म्हणून साजरा करत आहोत. आज मी या कार्यक्रमात शब्द देते की मी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्यांच्या सेवेत राहीन. मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं, ज्यांच्यामुळे मला प्रतिष्ठा मिळाली त्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो जणांना वाऱ्यावर सोडणार नाही, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही असे पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.

कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव

या कार्यक्रमात सामाजिक जाणिवेतून कांही कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.  यामध्ये कुस्तीपटू राहुल आवारे  (पाटोदा) ,महिला क्रिकेटपटू कविता पाटील(केज) , अनाथांसाठी कार्य करणारे संतोष गर्जे  (गेवराई ), उसतोड मजूरांसाठी सुलभ उसवाहतुक यंत्र तयार करणारे प्रयोगशिल शेतकरी गुरुलिंग स्वामी (उस्मानाबाद ), आदींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांना स्वयंरोजगार उपयोगी  मशिनरीचे  व मंजूर कर्जनिधीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राम शिंदे, सदाभाऊ खोत यांनीही आपल्या भाषणात साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे संचलन भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले तर आ. आर. टी. देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रज्ञाताईंच्या भेटीसाठी छत्रपती उदयनराजे स्टेजवरून खाली उतरले

मुंडे साहेबांना वडिलांसमान मानणा-या खा. उदयनराजे भोसले यांनी स्टेजच्या खाली उतरून समोर लोकांमध्ये बसलेल्या आईची म्हणजे प्रज्ञाताई मुंडेंची भेट घेतली. साहेबांच्या आठवणीने ते भावनावश झाले. डोळ्यातील अश्रू ते रोखू शकले नाहीत. हा प्रसंग पाहून उपस्थितही गहिवरून गेले.

क्षणचित्रे

• लाडक्या लोकनेत्याच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच गोपीनाथ गडावर राज्याच्या काना कोप-यातून  कार्यकर्ते मोठया संख्येने दाखल झाले होते. अनेक दिंड्या, पताका घेवून वारकरीही दाखल झाले.

•मुख्यमंत्री फडणवीस यांचे हेलिकॉप्टरने कार्यक्रम स्थळी आगमन झाले. गडावर येताच समाधीस्थळाचे दर्शन घेऊन मुंडे साहेबांना अभिवादन केले. केंद्रीय मंत्री उमा भारती खराब हवामानामुळे विमानाला उशीर झाल्याने येवू शकल्या नाहीत त्यामुळे व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी गोपीनाथराव मुंडेंना अभिवादन केले.

•जाहीर कार्यक्रमात कधीही व्यासपीठावर न येणार्‍या ना. पंकजाताई यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी यावेळी देखील लोकांमध्येच बसून कार्यक्रम ऐकला.

• जनतेनी शिस्तबद्ध रांगेतून लोकनेत्याच्या समाधीचे दर्शन घेतले.

• कार्यक्रमापूर्वी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी आपल्या किर्तनात मुंडे साहेबांच्या आठवणी जाग्या केल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.

• गोपीनाथ गड परिसरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

• कार्यक्रमानंतर  महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. राज्यातील लाखो मुंडे भक्तांनी अतिशय शिस्तीत याचा लाभ घेतला.

• मराठवाड्यातील आमदार, खासदार भाजपा, शिवसेना, रिपाइंचे तसेच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतले समाधीचे दर्शन

• अलोट जनसागर येवूनही सुरेख व शिस्तबद्ध नियोजनामुळे कार्यक्रम व महाप्रसादाचा सर्वानी लाभ घेतला.

• राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांना यावेळी दोन मिनिटं स्तब्ध उभा राहून सर्वानी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Previous articleआरक्षणाला विरोध करणारे धनगर समाजाला काय आरक्षण देणार – धनंजय मुंडे
Next articleछगन भुजबळ गिरिश महाजनांची बंद खोलीत चर्चा