छगन भुजबळ गिरिश महाजनांची बंद खोलीत चर्चा
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांची भेट घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते सध्या त्यांच्या निवासस्थानी धाव घेताना दिसत आहे.लोकतांत्रिक जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांच्या भेटीनंतर आज नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची भेट घेवून सुमारे पाऊण तास बंद खोलीत चर्चा केली.
जामीनावर सुटका झाल्यानंतर सांताक्रुझमधील भुजबळांच्या निवासस्थानी नेत्यांची रिघ लागली आहे.कालच लोकतांत्रिक जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांनी छगन भुजबळ यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यासोबत लोकभारतीचे अध्यक्ष आणि आ.कपिल पाटील हे ऊपस्थित होते.लालूप्रसाद यादव यांनीही भुजबळांशी फोनवरुन चर्चा करून प्रकृतीची विचारपूस केली.
आज राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळांच्या निवासस्थानी जावून त्यांची सुमारे पाऊण तास चर्चा केली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या दोन नेत्यामध्ये बंद खोलीत चर्चा झाल्याने कोणत्या विषयावर चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. येत्या २५ जून रोजी नाशिक शिक्षक विधानपरिषदेची निवडणूक होत आहे.नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणूकीत नाशिक स्थानिक स्वराज्य मतदार संघातुन शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. मंत्री महाजनांच्या पाठोपाठ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरिषचंद्र चव्हाण यांनीही आज छगन भुजबळांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपुस केली.