… आणि माजी मंत्री भास्कर जाधवांना लागला शॉक
चिपळूण : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे व माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे यांच्या विशेष उपस्थितीत असलेल्या एका कार्यक्रमात चक्क शॉकच लागला.
दैनिक सागरचे संस्थापक कै. नाना जोशी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त काल चिपळूण येथे आयोजित एका कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी नारायण राणे व सुनील तटकरे यांच्यासह भास्कर जाधव यांनी देखील विशेष हजेरी लावली होती. प्रसंगी मनोगत व्यक्त करण्यासाठी भास्कर जाधव उभे राहिले असता त्या ठिकाणी असलेल्या डेस्कवर प्रकाश पडेल अशी व्यवस्था करण्यात आली होती. आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण करत असताना त्यांचा हात वरील बाजूला असलेल्या शोभेच्या दिव्याला लागल्याने त्यांना “शॉक” लागला आणि ते मागे सरकले गेले. एवढेच नाही तर त्यांना सलग दुसऱ्यांदा हा धक्का जाणवला. गमतीने त्यांनी आपले काही चुकत असणार म्हणून नानांनी (कै. नाना जोशींनी) आपल्याला चूक सुधारण्यासाठी संकेत दिला असल्याचे सांगून वातावरण खेळीमेळीचे केले. परंतु यावेळी उपस्थितांमध्ये चर्चा रंगली ती म्हणजे तटकरे आणि जाधव यांच्यात सुरु असलेल्या शीतयुद्धाचीच…
नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देत राणेंनी सेना उमेदवाराचा दारुण पराभव करण्यासाठी हातभार लावला. राणे-तटकरे यांची सर्वश्रृत मैत्री यावेळी सुद्धा सेनेचा पराभव करण्यात यशस्वी झाली. अनिकेत तटकरे यांच्या विजयानंतर मात्र भास्कर जाधवांनी मिठाचा खडा टाकत येत्या विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या परिवारातूनच कोणाला उमेदवारी देता येईल का, याचा शोध घेत असल्याचे सांगत तटकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या घराणेशाहीचा आरोप पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना केला होता. सुनील तटकरे यांनी मात्र यावर अद्याप प्रतिक्रिया देणे टाळले असले तरी त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील वाढता जनसंपर्क, लोकप्रियता तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीत सर्वपक्षीयांकडुन मिळालेली मदत आणि नारायणे राणे यांची मोलाची साथ ही भास्कर जाधवांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून “शॉक” देणारी ठरु शकते, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होतांना दिसून आली.