कोकण पदवीधर निवडणूकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी

कोकण पदवीधर निवडणूकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी

मुंबई : विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली असून, निवडणूकीची जोरात तयारी सुरू केली आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप पक्षाची संयुक्त बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या बुधवारी ६ जून रोजी सकाळी ११ वाजता नवी मुंबईतील विष्णूदास भावे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातुन प्रतिनिधित्व करणारे निरंजन डावखरे यांनी आमदारकीचा आणि राष्ट्रवादीचा राजीनामा देवून नुकताच भाजपात प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादी सोडताना स्थानिक पातळीवरील राजकारणाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची करून जोरदार तयारी करण्यास सुरूवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने मित्र पक्षांना एकत्रित करून उद्या नवी मुंबईतील विष्णूदास भावे सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री आमदार सुनिल तटकरे, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंतभाई पाटील, राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, माजी मंत्री रविशेठ पाटील, माजी आमदार माणिकराव जगताप, आमदार श्रीमती हुस्नबानु खलिफे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Previous articleकॅन्टोमेंटच्या विकासासाठी राज्याकडून खास निधी  : गिरीश बापट
Next articleमुंबई शिक्षक मतदार संघातुन अनिल देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल