एसटी महागली :  एसटीची  १८ टक्के भाडेवाढ

एसटी महागली :  एसटीची  १८ टक्के भाडेवाढ

मुंबई  : एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात येत्या १५ जूनपासून १८ टक्के इतकी वाढ करण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. डिझेलचे वाढते दर तसेच एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने कळविले आहे.

याचबरोबर यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही ५ रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या प्रवासाचे तिकीट ७ रुपये असेल तर त्याऐवजी ५ रुपये आकारले जातील. तसेच ८ रुपये तिकीट असल्यास १० रुपये तिकीटदर आकारला जाईल. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांदरम्यान नेहमी वादावादी होते. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार असून ही वादावादी थांबेल, असे एसटी महामंडळाने कळविले आहे.

तिकीट दरवाढीबाबत प्रतिक्रिया देताना राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते म्हणाले, इंधनाच्या दरवाढीमुळे महामंडळावर दरवर्षी साधारण ४६० कोटी रुपये इतका खर्च वाढला आहे. तसेच कामगारांसाठी नुकतीच ४ हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ करण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे तिकीट दरात ३० टक्के इतकी वाढ करावी, असे महामंडळाने प्रस्तावित केले होते. पण प्रवाशांवर जास्त आर्थिक भार पडू नये यासाठी ही दरवाढ ३० टक्क्यांऐवजी फक्त १८ टक्के इतका करण्याचा निर्णय अंतिमत: घेण्यात आला आहे. हा निर्णयही नाइलाजास्तव घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

तथापि, राज्य शासनाने डिझेलवरील विविध कर माफ करावेत, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीला मुख्यमंत्र्यांसह वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही मागणी मान्य झाल्यास तिकीट दरवाढीचा फेरविचार करण्यात येईल, असे मंत्री  रावते यांनी सांगितले

Previous articleउद्या खा.नारायण राणेंची तोफ धडाडणार
Next articleसहा दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज