सहा दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

सहा दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा

मुंबई  : भारतीय हवामान खात्याने पुढील सहा दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला असून उद्या, ७ जून ते सोमवार,११ जून या कालावधीत राज्यात विशेषतः कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्याअनुषंगाने प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती निवारण कक्षाने केले आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या, ७ जूनरोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवार, ८ जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची व अतिवृष्टीची शक्यता असून रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

शनिवार,  ९ जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची व अतिवृष्टीची शक्यता आहे.  तर १० व ११ जून रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुंबई व नजिकच्या परिसरांसह बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस व अतिवृष्टीचा अंदाज आहे.हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानंतर, राज्य आपत्ती निवारण कक्षाने राज्यातील बहुतेक ठिकाणी विशेषतः कोकण परिसरात अति दक्षतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व जिल्ह्यातील प्रशासनास सतर्क राहण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिले आहेत.

मंत्रालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका , नगरपालिका, तहसिलदार येथील सर्व नियंत्रण कक्ष पूर्णवेळ कार्यरत ठेवण्याचे, सर्व जिल्हास्तरीय व निम्नस्तरीय अधिकारी यांना आपापल्या मुख्यालयात परिस्थितीवर लक्ष ठेऊन राहण्याचे व आवश्यक त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करणे, सर्व जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कार्यवाहीसाठी दक्ष आहेत याबाबत खात्री करण्याच्या सूचना राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सर्व जिल्हा प्रशासनास दिले आहेत.

प्रशासनास सज्ज राहण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील सहा दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेऊन राज्यातील विशेषतः कोकण भागातील जिल्हा प्रशासनास सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्कालीन यंत्रणा तयार ठेवून अशा परिस्थितीत योग्य ती दक्षता घेण्याच्या व नागरिकांना सहकार्य करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. मुसळधार पाऊस व अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही  पाटील यांनी यावेळी केले.

 

Previous articleएसटी महागली :  एसटीची  १८ टक्के भाडेवाढ
Next articleशहांची बकेट लिस्ट : कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष