कधी टोपी न घालणारे इफ्तारची दावत देत आहेत- शरद पवार

कधी टोपी न घालणारे इफ्तारची दावत देत आहेत- शरद पवार

मुंबई : जे लोक कधी टोपी घालत नव्हते ते आज इफ्तारची दावत ठेवत आहेत.या लोकांचे मन साफ नाही म्हणून असे प्रयत्न केले जात असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने दरवर्षी इफ्तार दावतचे आयोजन केले जाते. यावर्षीही सीएसएमटीच्या जवळ असलेल्या हज हाऊस येथे इफ्तार दावतचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.मागील अनेक वर्षापासून आम्ही ही दावत आयोजित करत आहोत. या दावतला हजर राहिलेल्या सर्व लोकांचे मी आभार मानतो असेही पवार म्हणाले.

आपल्या देशात विविध जाती-धर्माचे लोक नांदत असून एकता दिसून येते. पण दुर्देवाने आपल्या देशात काही संघटना आहेत, काही पक्ष आहेत जे आपल्या बंधुत्वामध्ये कटुता आणू पहात आहेत असा आरोपही पवार यांनी यावेळी केला.मी वर्तमानपत्रात वाचले की, काही प्रतिगामी शक्ती आज इफ्तार दावतचे आयोजन करत आहेत. नागपूरात एक संस्था आहे ज्यांनी यावर्षी रोजा इफ्तार दावतचे आयोजन केले होते. हा लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचेही पवार म्हणाले.आज आपल्या देशात सर्वच गोष्टींवर बंधने घातली जात आहेत. कोण काय खाणार आणि काय घालणार हे ठरवले जात आहे ही गोष्ट योग्य नसल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मांडले.शरद पवार या देशातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेवून जाणारे नेतृत्व आहे. पवार यांनी नेहमी अल्पसंख्यांक समाजाचा विचार केला. मात्र आज अल्पसंख्यांक समाजाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.या इफ्तार पार्टीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, खासदार माजीद मेमन, राष्ट्रीय सरचिटणीस डी.पी.त्रिपाठी आदींनी आपले विचार मांडले.

या इफ्तार पार्टीला पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, खासदार माजीद मेमन, राष्ट्रीय सरचिटणीस डी.पी.त्रिपाठी, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील,माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री राजेश टोपे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विदया चव्हाण, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गफार मलिक, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, आदींसह पक्षाचे मुंबईतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleशहांची बकेट लिस्ट : कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष
Next articleउद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात दोन तास बंद दाराआड चर्चा