परळीचा आमदार मीच होणार- धनंजय मुंडे

परळीचा आमदार मीच होणार- धनंजय मुंडे

परळी : यवतमाळ जिल्ह्यातील वणीच्या एका कार्यक्रमात आपण वणीसाठी परळीची जागा सोडू असे वक्तव्य केले ते तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे यासाठी केले होते त्यामुळे स्थानिक विरोधकांना आनंद झाला होता मात्र येथील जनतेची इच्छा असल्याने २०१९ ला मीच या भागाचा आमदार असेल असे विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे म्हणाले.

परळी तालुक्यातील मलनाथपुर येथे ५०० कोटी रूपये खर्चुन उभारण्यात आलेल्या ८० मेगावॅट खाजगी सोलार पॉवर प्रकल्पाचे उदघाटन आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.परळी तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत राज्य व केंद्रातील भाजपा सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे परळीच्या विकासाला चालना मिळावी, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी हा प्रकल्प उभारल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

शापुरजी पालनजी यांच्या सोलार एज पॉवर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा.लि व स्टर्लिंग अ‍ॅण्ड विलियम्स या कंपन्यांनी परळी तालुक्यात ५०० कोटी रूपये खर्चुन ८० मेगा वॅट विज निर्मितीचा हा सोलार प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी मलनाथपुर, वाघाळा, म्हातारगांव या गावातील ४०० एक्कर खडकाळ जमिन संपादीत करण्यात आली असुन, त्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथुन ८० मेगा वॅट विज निर्मीती सुरू झाली असुन, सदर वीज कंपनी तर्फे महाराष्ट्र शासनाला दिली जाणार आहे. अतिशय झपाट्याने हा प्रकल्प पुर्ण करण्यात आला असुन, त्यामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळाला असुन यापुढेही अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. खाजगी क्षेत्रातील हा राज्यातील सर्वात मोठा सोलार प्रकल्प आहे. दिवाळी पाडव्याला भूमीपूजन झालेल्या या प्रकल्पातून आज ४ महिन्यात वीज निर्मिती सुरू झाली.

दरम्यान परळी तालुक्यात १०- १० मेगावॅटचे आणखी प्रकल्प होणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली. औष्णिक वीज निर्मितीमुळे देशाच्या नकाशावर असलेल्या परळी शहरात आता सौर ऊर्जेची निर्मिती होऊ लागल्यामुळे या भागाची नवी ओळख निर्माण झाली आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे या भागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल , या भागातील जनतेचे एम.आय.डी.सी. चे स्वप्न मीच पूर्ण करुन दाखवेल असा विश्वास विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवला आहे. या प्रकल्पाचे उदघाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते मात्र हवामान बदलामुळे त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने  मुंडे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की , आपल्या भागाच्या विकासासाठी स्वर्गीय पंडितअण्णा मुंडे यांनी कष्टाने तयार केलेली जमीन आपण दिली त्याच बरोबर या भागातील शेतक-यांनी जमिनी दिल्यामुळे हा प्रकल्प होऊ शकला आहे.  शरद पवार  आणि अजित पवार यांच्यामुळे हा प्रकल्प आला त्याबद्दल धनंजय मुंडे यांनी त्यांचे आभार मानले.

परळी तालुक्यातील जनतेचे एम.आय.डी.सी. चे स्वप्न आहे. सिरसाळा भागात त्यासाठी आपण उद्योग मंत्री यांच्या सोबत बैठका घेतला पाठपुरावा सुरू केला आहे .त्यामुळे सर्वे झाला आहे हे स्वप्न मीच पूर्ण करेल असा शब्द धनंजय मुंडे यांनी दिला. सर्वे झाल्यावर इथल्या लोकप्रतिनिधीला जाग येत असल्याचा टोला त्यांनी लगावला. या भागात खाजगी साखर कारखाना उभारणीचे काम सुरू असून ते ही लवकरच पूर्ण करू असा शब्द त्यांनी दिला. सत्ता असूनही ज्यांना चार वर्षात एकही प्रकल्प आणता आला नाही त्यांनी आपल्या कामात अडथळा आणू नये. आयता मिळालेला कारखाना नीट चालवून शेतक-यांचे पैसे द्यावेत अशी मागणी त्यांनी केली.

Previous articleपूर्ण पिक्चर अजून बाकीच आहे : उद्धव ठाकरे
Next articleपांडूरंग फुंडकर यांच्या निधनाने भाजपाचे मोठे नुकसान –  पंकजा मुंडे