गतवैभव मिळविण्यासाठी कोकण पदवीधर निवडणूक महत्वाची : मुख्यमंत्री

गतवैभव मिळविण्यासाठी कोकण पदवीधर निवडणूक महत्वाची : मुख्यमंत्री

ठाणे  : कोकण पदवीधर मतदारसंघ हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला होता. मतदारसंघाचे गतवैभव मिळविण्यासाठी पदवीधर निवडणूक महत्वाची आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुथची रचना लक्षात घेत मेहनत घेऊन निवडणूक जिंकावी, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील टिप टॉप प्लाझा येथे कोकण विभागातील भाजप कार्यकारिणीची बैठक व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे ठाणे विभागीय अध्यक्ष व खासदार कपिल पाटील, राजेंद्र गावित, पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे, आमदार संजय केळकर, किसन कथोरे, गणपत गायकवाड, मंदा म्हात्रे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, प्रशांत ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, विनय नातू, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा माधवी नाईक, भाजपचे कोकणातील जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित होते. या मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठी प्रमाणात उपस्थिती  होती.

पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे आपत्ती आली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मित्र पक्षाचे आव्हान स्वीकारुन कार्यकर्त्यांनी विजय मिळविला. पक्षाची इज्जत, ती आपली इज्जत असे मानून कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनतीने विजय साकारला, याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतूक केले.

पालघरमधील निवडणुकीचा विजय साजरा करीत असतानाच, आता कोकण पदवीधर मतदारसंघाचे पडघम वाजत आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपचे गतवैभव होता. वसंतराव पटवर्धन, अशोकराव मोडक, संजय केळकर आदी दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात भाजप रुजवली होती. मात्र, मागील निवडणुकीत भाजपची रचना विस्कळीत होती. तर अॅड. निरंजन डावखरे यांनी चांगली रचना करुन विजय मिळविला. आता अॅड. निरंजन डावखरे हेच भाजपमध्ये आले आहेत. त्यांना निवडून आणून आपल्याला भाजपचे गतवैभव मिळवायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. पदवीधर निवडणुकीत माहौल नसतो. ही निवडणूक हवेत होऊ शकत नाही. तर प्रत्येक मतदारापर्यंत संपर्क साधून नियोजन करावे लागते. त्यादृष्टीने कोकणातील भाजप कार्यकर्त्यांनी बुथनिहाय रचना करुन निवडणूक जिंकण्याची व्यूहरचना करावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. आपण होणाऱ्या मतदानापैकी 60 टक्के मतदान भाजपला करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

अॅड. निरंजन डावखरे हे युवा नेते असून, ते सातत्याने कोकणासह राज्यातील विविध प्रश्न घेऊन येत असत. एक चांगला युवा नेता पक्षाकडे असावा, या धोरणातून त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, कोळी महासंघाचे नेते अॅड. चेतन पाटील यांनी नावनोंदणी केली होती. तर अॅड. निरंजन डावखरे यांनीही मोठ्या प्रमाणावर मतदारनोंदणी केली. सर्व इच्छूकांचा विचार करुन भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीने अॅड. निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कोळी महासंघाचा निरंजन डावखरेंना पाठिंबा

कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप-रिपब्लिकन आघाडीचे उमेदवार अॅड. निरंजन डावखरे यांना कोळी महासंघाचे नेते चेतन रमेश पाटील यांनी आपल्या समर्थकांसह पाठिंबा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महासंघाच्या पाठिंब्याचे स्वागत केले. तर अॅड. डावखरे यांनी आभार मानले आहेत.

Previous articleनितीन गडकरी नाना पाटेकरांच्या भेटीला
Next articleमुख्यमंत्र्यांच्या कॅनडा व अमेरिका दौऱ्यामुळे राज्यातील प्रकल्पांना गती मिळणार