ते माधुरीला भेटले तर आम्ही शेतमजुराला भेटु : धनंजय मुंडे

ते माधुरीला भेटले तर आम्ही शेतमजुराला भेटु : धनंजय मुंडे

भाजपाच्या संपर्क फॉर समर्थनवर धनंजय मुंडे यांची टीका

पुणे :  देश आणि राज्यातील सामान्य जनता, गरीब जनता त्रस्त असतांना ते त्यांचे दुःख जाणून घेण्याएवजी बड्यांना भेटत आहेत. ते भलेही माधुरी दीक्षितला भेटले तर आम्ही शेत मजुराला भेटु, ते टाटाला भेटले तर आम्ही बाटा वापरणा-या सामान्य जनतेला भेटू, ते कपील देवला भेटले तर आम्ही बळी देवराजाला भेटु अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपाच्या संपर्क फॉर समर्थन अभियानावर जोरदार टीका केली आहे.

पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त व पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल यात्रेच्या समारोप सभेनिम्मित आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे अध्यक्ष खा.  शरद पवार, श्री. प्रफुल्ल पटेल,  छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील,  अजित पवार,  सुप्रिया सुळे,  सुनील तटकरे व पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते.

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ माधुरी दिक्षित, कपील देव, टाटा यांना भेटायला वेळ आहे पण महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला जाण्याची आवश्यकता भासली नाही असा हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी केला. मते मागतांना महाराजांच्या नावाने मागितली परंतु त्यांच्या राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा त्यांना विसर पडतो असा हल्लाही त्यांनी चढवला.२०१९ चा स्थापना दिवस हा सत्तांतराचा स्थापना दिवस, परिवर्तनाचा स्थापना दिवस म्हणून साजरा करु या, असं आवाहन करतांनाच महाराष्ट्र राष्ट्रवादीमय होतोय असा दावा धनंजय मुंडे यांनी केला.

Previous articleभुजबळ परिवार शरद पवार यांच्या भेटीला !
Next articleमहाराष्ट्र सदन सुंदर, छगन भुजबळ अंदर : भुजबळ