वंचितांशी नाळ जोडली गेल्यामुळेच मुंडे साहेब अद्वितीय लोकनेता झाले : पंकजा मुंडे

वंचितांशी नाळ जोडली गेल्यामुळेच मुंडे साहेब अद्वितीय लोकनेता झाले : पंकजा मुंडे

लोकनेते गोपीनाथराव मुंडे उद्यानाचे पुण्यात थाटात भूमिपूजन; विविध विकास कामांचेही झाले लोकार्पण

पुणे : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची नाळ समाजातील सर्व जातीधर्माशी तसेच वंचित घटकांशी जोडली गेली होती, आपल्या अलौकिक कार्यातून गोरगरिबांचे प्रेम त्यांनी मिळवले, त्यामुळेच ते अद्वितीय नेता झाले असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजा मुंडे यांनी येथे केले. वंचित घटकांचा वाली आणि वाणी बनण्याचे त्यांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मी कटीबध्द आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुणे महानगरपालिकेच्या हडपसर प्रभाग क्रमांक २६ मध्ये नगरसेवक संजय घुले यांच्या पुढाकाराने उभारण्यात येणा-या लोकनेते गोपीनाथराव मुंडे उद्यानाचे भूमिपूजन व विविध विकास कामांचा शुभारंभ  पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. आ. माधुरी मिसाळ, आ. योगेश टिळेकर, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, नगरसेवक घुले, गटनेते भिमाले आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावांने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उद्याने, सभागृह, व्यायामशाळा, संस्था, इमारती आहेत, गावोगावी त्यांचे पुतळे उभारले जात आहेत, अशा प्रकारचे कार्य असणारा त्यांच्यासारखा लोकोत्तर नेता महाराष्ट्रात झाला नाही असे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. मुंडे साहेब वंचितांचे नेते होते. ज्यांना कोणी वाली नाही, ज्यांची कोणी वाणी नाही, अशा घटकांचा वाली आणि वाणी बनण्याचे वचन त्यांनी माझ्याकडून घेतले होते, ते वचन पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझी आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्यांची सेवा मी करणार आहे, त्यांच्याशी अंतर पडू देणार नाही, त्यांच्या पाठिशी सदैव राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मुंडे साहेबांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणार

मुंडे साहेबांकडे दिव्यदृष्टी होती म्हणूनच त्यांनी मला राजकारणात आणले. त्यांनी जनतेला दिलेला प्रत्येक शब्द सत्तेच्या माध्यमातून मी पूर्ण करणार असल्याचे  पंकजा मुंडे म्हणाल्या. नीर आणि नारी या दोन शब्दांवर काम करणे मी सुरू केले. जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरली. ही योजना माझी नसून सरकारची आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती यशस्वी केली पण या योजनेशी माझे नांव जोडले गेले ही माझ्यासाठी महत्वाचे आहे असे सांगून सन २०२० पर्यंत प्रत्येकाला घर, पक्की सडक देण्याबरोबरच सरकार अनेक लोकोपयोगी योजना यशस्वीपणे अमलात आणत असल्याचे त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा घेतला समाचार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा आज पुण्यात समारोप होता. या यात्रेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील लवकरच समारोप होणार आहे अशा शब्दांत  पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. आम्हाला गांधीजी स्वच्छता अभियानाच्या बोर्डावर पहायला आवडतात आणि त्यांनी नोटावर पहायला आवडतात. गरीबांचे वेदना कमी करण्यासाठी सत्तेत असताना यांनी काय केलं? बॅंका तुमच्या, कारखाने तुमचे, संस्था तुमच्या, मग हल्लाबोल कशासाठी व कुणावर करता असा सवाल त्यांनी केला. वर्षानुवर्षे गरीबांच्या गल्ल्यावर डल्ला मारणारे आज हल्लाबोल करत आहेत. जातीपातीच्या भिंती उभारून त्यांच्यात भांडणे लावून स्वतःचे असुरक्षित झालेले राजकारण सुरक्षित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस यातून करत आहे असा आरोप त्यांनी केला. जनता भोळी असली तरी वेडी नाही. भाजपने जनतेचा विश्वास संपादन केला आहे त्यामुळे आम्हीच पुन्हा सत्ता स्थापन करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमहाराष्ट्र सदन सुंदर, छगन भुजबळ अंदर : भुजबळ
Next articleधमकीचे पत्र म्हणजे जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रकार : पवार