धमकीचे पत्र म्हणजे जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रकार : पवार

धमकीचे पत्र म्हणजे जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रकार : पवार

शरद पवारांची भाजपवर टीका

पुणे : भीमा-कोरगाव दंगल प्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणास्तव काही जणांना अटक करण्यात आली यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.भीमा कोरेगाव येथिल उद्योग केले हे जगाला माहिती असून, ज्यांचा संबंध नाही अशांवर सरकार कारवाई करत असल्याचा आरोप पवार यांनी केला. धमकीचे पत्र आल्यावर कोणी प्रसार माध्यमांशी बोलत नाही तर कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे ही धमकी खरीच आहे का असा सवाल उपस्थित करीत, धमकीच्या पत्रावरून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार आहे असा आरोप पवार यांनी केला आहे.

सध्या चळवळ चालवणाऱ्यांना नक्षलवादी ठरवले जात आहे.भीमा कोरेगाव दंगल कुणी घडवली असा सवाल करतानाच सत्तेचा गैरवापर सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथील राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या सभेत केला.मुख्यमंत्र्यांच्या धमकी पत्रावर बोलताना शरद पवार यांनी जोरदार टिका केली. धमकी देणारी पत्र कोण वर्तमानपत्रात देत नाही. ही सगळी सहानभुती मिळवण्यासाठीच हा प्रयत्न असल्याची टिका त्यांनी केली. शिवाय त्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र यायला हवे. ती प्रक्रिया मी सुरु केली असून, साथ देवून परिवर्तन घडवण्याचा पुढाकार घ्यावा असे आवाहन पवार यांनी केले.

सत्ता नसताना गलितगात्र व्हायचं नाही आणि सत्ता आल्यावर मस्तवाल व्हायचं नाही. करायचं ते लोकांसाठी करायचं हे सुत्र कार्यकर्त्यांनी करावं. आज नव्याने उभं रहायचं आहे असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला.देशाला आज पर्याय हवा आहे. आपण तो पर्याय देण्याचा प्रयत्न करतोय. आज सगळयांची एकत्र येण्याची मानसिकता असल्याचेही पवार म्हणाले.

नोटबंदी केली म्हणून सांगायचे आणि शेजारी देशात भारतीय चलन सापडत आहे. शेजारी नेपाळ देशात चलन सुरु ठेवण्याची भूमिका सरकारची आहे. पेट्रोलचे दर एक रुपयांनी कमी केले की, गॅस सिलेंडरचे दर वाढवायचे असा प्रकार सरकारचा सुरु असल्याची टीकि पवार यांनी केली. भंडारा-गोंदियामध्ये आमचा विजय झाला आहे. तरीही आम्ही बुथवर घडलेल्या घटनांची लेखी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आत्ता सगळे पक्ष एकत्र येवून वाट्टेल ते झाले तरी ही मशीन आम्हाला नको अशी भूमिका घेणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

भाजपाच्या काळात महाराष्ट्राची घडी विस्कटतेय : अजित पवार

अठरापगड जातींना बरोबर घेवून जाणाऱ्या महाराष्ट्रात सध्या भाजपाच्या काळात महाराष्ट्राची घडी विस्कटली आहे अशी भीती विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पुण्याच्या हल्लाबोल सांगता सभेत व्यक्त केली.

हवामान खात्याचा आज पाऊस लागण्याचा अंदाज होता परंतु हवामान खात्याकडून जेव्हा असे सांगितले जाते त्यावेळी पाऊस हमखास पडत नाही आणि आज तेच घडले सांगताच सभेत एकच हसा पिकवला.

त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेच्या ठिकाणी नेटवर्क बंद करणाऱ्या सरकारचा चांगलाच समाचार घेतला. ज्यांना जे पटेल ते घेईल. एवढी सत्तेची मस्ती आणि माज बाळगू नका असा इशाराही दादांनी यावेळी दिला.देशाचे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जात होते हे ऐकत आलो आता मुख्यमंत्रीही परदेश दौऱ्यावर जावू लागले. आज मुख्यमंत्री परदेशात गेले, वाण नाही परंतु गुण तरी लागला असा टोलाही त्यांनी लगावला.

सबका साथ नाही तर सबका विश्वासघात –जयंत पाटील

सबका साथ सबका विकास नाही तर सबका साथ सबका विश्वासघात ही नवीन घोषणा भाजपासाठी लागू आहे अशी जोरदार टिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्याच्या सांगता सभेत भाजपावर केली.

या मेळाव्यात जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार टिका केली. त्यांनी आपल्या भाषणामध्ये मोदी हे टिव्हीमधून आलेले पंतप्रधान असल्याचे सांगतानाच ८ कोटी लोकांना रोजगार मिळायला हवा होता परंतु तो मिळालेला नाही. बॅंकांचे बुडीत कर्ज ५ टक्क्यांवरुन १२ टक्क्यांवर गेले आहे. सगळी अर्थव्यवस्था अडचणीत आणण्याचे पाप या सरकारने केले आहे.

देशातील सर्व समाज आज अस्वस्थ आहे. मुस्लिम, दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. उनावच्या दलित मुलाला न्याय मिळाला नाही. रोहित वेमुलाला जीव गमवावा लागला. भीमाकोरेगावची दंगल कुणी घडवली. दोन समाज भिडले पाहिजेत अशी मानसिकता या सरकारची आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.२०१९ नाही तर डिसेंबर २०१८ च्या तयारीला लागा असे आदेश देतानाच भविष्यकाळात सर्वात मोठा पक्ष केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडतानाच भविष्यात बुथ कमिटयांच्या माध्यमातून पक्ष वाढविण्याचे आणि त्यादृष्टीने काम करण्याचे स्पष्ट केले.

Previous articleवंचितांशी नाळ जोडली गेल्यामुळेच मुंडे साहेब अद्वितीय लोकनेता झाले : पंकजा मुंडे
Next articleपवारांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही : मुख्यमंत्री