तुमचे प्रेम आणि उपकार शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही: छगन भुजबळ
नाशिक : गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीपासून नाशिकसह महाराष्ट्रातील जनतेने भुजबळ कुटुंबीयांना जो आधार दिला, प्रेम दिले त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा आभारी असून तुमचे प्रेम आणि उपकार शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही असे सांगून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज सर्व नागरिकांचे आभार मानले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व नाशिकचे माजी खा.समीर भुजबळ हे गेल्या अडीच वर्ष्याच्या कालावधीनंतर आज १ वाजेच्या सुमारास नाशिक शहरात दाखल झाले. यावेळी नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथे हजारो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे फटक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मी भुजबळ नावाच्या टोप्या परिधान करून घोषणाबाजी केली.
यावेळी आभार व्यक्त करतांना छगन भुजबळ पुढे म्हणाले की, नाशिकसह महाराष्ट्रातील जनतेने वेगवेळ्या प्रकारे आंदोलने केली. नाशिक शहरात ३ ऑक्टोबर रोजी लाखोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. सातत्याने महाराष्ट्रातील जनतेचे पत्र निवेदने याद्वारे प्रयत्न सुरु होते. गेल्या दोन अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील जनतेने आमच्यावर भरभरून प्रेम केले. त्यामुळे मी महाराष्ट्रातील जनतेचा मनापासून आभारी आहे. तुमचे हे प्रेम आमच्यावर अखंड राहो, पुढची वाटचाल करण्यासाठी तुमच्या शक्तीचे बळ भुजबळांना मिळो, या बळावरच पुढची वाटचाल करू असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस, समता परिषदेसह विविध राजकीय पक्ष, संघटना यांनी वेळोवेळी मदत केली त्याबद्दल त्यांचेही त्यांनी आभार मानले. तसेच यापुढील काळात सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन जनतेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी शेवटी सांगितले.
त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी खा. समीर भुजबळ, आ.पंकज भुजबळ यांनी नाशिक शहरात प्रवेश करताच प्रथम पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी यांच्यापूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर गणेशवाडी,पंचवटी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास वशालीमार येथीलभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनकेले. तसेच यावेळी इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, विल्होळी, पाथर्डी फाटा, राणेनगर, लेखानगर, इंदिरानगर, गोविंदनगर, मुंबई नाका, आडगाव नाका, काट्या मारुती, गणेशवाडी, शालीमार याठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने नाशिकमध्ये ओझर स्थित सुंदर असे विमानतळ तयार केले आहे. याठिकाणी तब्बल चार वर्षांनंतर का होईना नाशिकची विमानसेवा सुरु होत आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र ती नियमित सुरु राहण्याची आवश्यकता आहे. नाशिक विमानतळावरून केवळ मुंबई शहारापुरती विमानसेवा मर्यादित न राहता देशातील दिल्ली, बँगलोर यासारख्या अति महत्वाच्या शहरांना जोडली जावी त्यामुळे नाशिक जिल्ह्यात विविध उद्योग व्यवसाय वाढीच मदत होऊन त्यातून नाशिकचा विकास होईल. असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ते आज राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीनंतर नाशिक शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात आमचे स्वागत केले. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. गेले अडीच वर्ष सर्व नागरिकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरु होते. भुजबळ कुटुंबियांना या अडचणीच्या काळात सर्व जनतेचा मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांच्या भेटीसाठी नाशिकला आलो आहे. तसेच येवल्यातही जाणार असून तेथील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न देखील समजून घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, नाशिक शहर व जिल्ह्यात विविध विकासाची कामे झाले आहेत. त्यात बोट क्लब, सप्तशृंगी गडावरील फनिक्युलर ट्रॉली यासारखे प्रकल्प पूर्ण झाले आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्याची आवश्यकता आहे. बोट क्लबसाठी परदेशातून बोटी आणल्या गेल्या आहे. मात्र त्यातील काही बोटी या इतरत्र हलविण्यात आल्या आहे. यासाठी नाशिककरांनी आवज उठविण्याची गरज होती असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच फनिक्युलर ट्रॉलीचे हा देशातील एकमेव आणि सुरुक्षित असा प्रकल्प आहे. त्यामुळे याला विशेष महत्व आहे. त्याचे उद्घाटन लवकरात लवकर करण्यात यावे असे सांगून ट्रॉलीचे उद्घाटन माझ्या हस्ते करावे यासाठी वणी गावातील नागरिकांनी ठराव केला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.










