नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी येत्या १५ जुलै रोजी मतदान
मुंबई : पुणे जिल्हयातील भोर या नगरपरिषदेची मुदत संपल्याने तर बार्शीटाकळी आणि वानाडोंगरी या नवनिर्मित नगरपरिषदा आणि मुक्ताईनगर, वडगाव व पारशिवनी या नवनिर्मित नगरपंचायतीसाठी तसेच विविध ११ नगरपरिषदा, नगरपंचायतींतील प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या १५ जुलै रोजी मतदान होणार असून, १६ जुलै रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.
सहारिया यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील भोर नगरपरिषदेची मुदत संपत आहे. त्याचबरोबर बार्शीटाकळी आणि वानाडोंगरी या नवनिर्मित नगरपरिषदा; तर मुक्ताईनगर, वडगाव व पारशिवनी या नवनिर्मित नगरपंचायती आहेत. शेगाव नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राकरितादेखील मतदान होत आहे. या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींबरोबरच पोटनिवडणूक होत असलेल्या संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
पोटनिवडणूक होत असलेल्या जागांचा नगरपरिषद, नगरपंचायतनिहाय तपशील: जव्हार (जि. पालघर)- ६ब, पोलादपूर (जि. रायगड)- १६, राजापूर (जि. रत्नागिरी)- अध्यक्ष, पंढरपूर (जि. सोलापूर)- १० ब, वाई (जि. सातारा)- ५अ, मेढा (जि. सातारा)- १५, निफाड (जि. नाशिक)- ६, श्रीरामपूर (जि. अहमदनगर)- १२ अ, नंदुरबार (जि. नंदुरबार)- १६ अ, लोहारा बु. (जि. उस्मानाबाद)- २, मोहाडी (जि. भंडारा)- १२ आणि शेगाव (जि. बुलडाणा)- हद्दवाढ क्षेत्र.
निवडणूक कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे-नामनिर्देशनपत्रे सादर करणे- १९ ते २५ जून ,नामनिर्देशनपत्रांची छाननी- २६ जून ,अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- २ जुलै , मतदानाचा दिनांक- १५ जुलै ,मतमोजणी १६ जुलै रोजी करण्यात येईल.










