मिसाबंदींना स्वातंत्र्य सैनिक म्हटलेले नाही : चंद्रकांत पाटील
मुंबई : मिसाबंदीमध्ये लोकशाही वाचविण्यासाठी तुरुंगात गेलेल्या लोकांना निवृत्तीवेतन देणे हे न्याय आहे. तसेच या मिसाबंदींना स्वातंत्र्य सैनिक म्हटलेले नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे चुकीचे आहे, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मिसाबंदींना पेन्शन देण्याच्या निर्णयावर केलेल्या वक्तव्याबद्दल पाटील म्हणाले की, आणीबाणीच्या विरुद्धच्या सत्याग्रहात एस.एम. जोशी, जयप्रकाश नारायण, भाई वैद्यांपासून पु.ल.देशपांडे यांच्यापर्यंत अनेकांनी सहभाग घेतला होता. लोकशाही वाचविण्यासाठी हा ऐतिहासिक लढा होता. १९७५-७७ काळात आलेली आणीबाणीमुळे लोकशाही हक्कांवर गदा आली. ही आणीबाणी योग्य होती का हे घोषित करावे. जर आणीबाणी योग्य नव्हती हे मान्य करणार असतील तर त्यावेळी लढा दिलेल्या व १९ महिने तुरुंगात राहिलेल्या लोकांना मानधन देणे कसे चुकीचे आहे, हे त्यांनी सांगावे. त्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना मानधन देऊ नका हे कुठल्या न्यायात बसते, हे त्यांनी सांगावे. त्यावेळच्या लढ्यात स्वयंसेवकांनी आपली घरे उद्धवस्त करून सहभाग घेतला. त्यांचे नुकसान भरून न येणारे आहे. त्यामुळे त्यांना ही पेन्शन देणे न्याय असून त्यांना केलेली ती छोटीसी मदत आहे.
आणीबाणीच्या चाळीस वर्षानंतर अशी पेन्शन सुरू करण्यास अगोदरच उशीर झाला आहे. त्यामुळे ही पेन्शन करणे चुकीचे नाही. मुद्दे संपल्यामुळे नवनवीन मुद्दे काढण्याची सवय असलेल्यांनी या मिसा बंदींना आम्ही स्वातंत्र्यसैनिक म्हटलेले नसतानाही असे बोलणे चुकीचे आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
राहुल गांधी असंवेदनशील; सवर्णांची माफी मागावी
जळगाव येथे घडलेली घटना ही सवर्ण व अवर्ण यामध्ये झालेली नाही. त्यामुळे काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी या विषयी केलेले वक्तव्य निषेधार्ह असून त्यांनी सवर्णांची माफी मागावी, अशी मागणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथे दोन मुलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवर खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर पाटील म्हणाले की, वाकडी येथे घडलेल्या घटनेमध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला ते अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे असून ज्यांनी अन्याय केले ते भटक्या जमातीचे आहेत. त्यामुळे राहुल गांधी सारख्या मोठ्या नेत्याने खातरजमा न करता समाजामध्ये वितुष्ट निर्माण होईल, असे वक्तव्य करणे हे देशाच्या स्वास्थाच्या दृष्टीने सोईचे नाही.त्याच प्रमाणे गांधी यांनी ट्विटरवर अपलोड केलेले व्हिडिओमध्ये अन्यायग्रस्त मुलांचे चेहरे दिसतात. हे कायद्याच्या विरुद्ध असून त्यामुळे त्यांच्या या कृतीतून असंवेदनशीलता दिसून येते, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.










