कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नव्हता : शरद पवार
पुणे : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज हे माझा आदर्श असल्यामुळेच राष्ट्रवादी काॅग्रेसच्या हल्लाबोल सभेच्या कार्यक्रमात फुले पगडीचा आग्रह धरला असे यातून कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याने पगडी विषयावर पडदा टाकण्यात आल्याची चर्चा आहे.
१० जून रोजी पुण्यात राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोप कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा महात्मा फुले पगडी देऊन सन्मान केला होता. त्यानंतर या पगडीवरून अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आज प्रथमच शरद पवार यांनी या विषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती हे एकच असतात त्यामुळे त्यांची पगडी इतर कोणाला वापरता येत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेश हॅट वापरली असली तरी रोजच्या आयुष्यात ते टोपी वापरत नव्हते. त्यामुळे महात्मा फुले यांचे पागोटे घालण्यात यावे अशी माझी इच्छा होती असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.










