नागपूरातील पावसाळी अधिवेशन १३ दिवसच चालणार

नागपूरातील पावसाळी अधिवेशन १३ दिवसच चालणार

मुंबई :   येत्या ४ जुलैपासून नागपूर येथे सुरू होणारे पावसाळी अधिवेशन २० जुलै पर्यंत चालणार आहे. एकूण १७ दिवसाच्या कामकाजात चार सुट्ट्या असल्याने हे अधिवेशन केवळ १३ दिवसच चालणार आहे. या अधिवेशनात नविन ९ आणि प्रलंबित १० विधेयके मांडली जाणार आहेत. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी आणि कार्यक्रम निश्चित करण्यात आला. यावेळी शासकीय कामकाजाच्या नियोजनावरही चर्चा करण्यात आली.

राज्य सरकारने या वेळेचे पावसाळी अधिवेशन येत्या ४ जुलैपासून नागपूरला घेण्याचा निर्णय घेतला होता. या अधिवेशनाचा कालावधी आणि कामकाजासंदर्भात आज विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली त्यानुसार ४ ते २० जुलै पर्यंत या अधिवेशनाचा कालावधी ठरविण्यात आला आहे. एकूण १७ दिवसाच्या कामकाजात चार सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार  शनिवार ७ जुलै, आणि रविवार  ८ जुलै, तसेच शनिवार १४ जुलै, आणि रविवार  १५ जुलै या दिवशी अधिवेशनाला सुट्टी असल्याने प्रत्यक्षात केवळ १३ दिवस कामकाज होईल.पहिल्या दिवशी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे शोकप्रस्ताव मांडण्यात येईल. या अधिवेशनात नविन ९ आणि प्रलंबित १० अशी एकूण १९ विधेयके मांडली जातील. विधानपरिषदेतील एकूण ११ सदस्यांची मुदत संपत असल्याने विधानपरिषदेत कामकाजाच्या शेवटच्या दिवशी या सदस्यांना निरोप दिला जाणार आहे.

विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, शिक्षण मंत्री विनोद तावडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आ. अजित पवार, जयंत पाटील,गणपतराव देशमुख उपस्थित होते. विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती माणिराव ठाकरे, मुख्यमंत्री, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,संसदीय कार्यमंत्री, आ. सुनिल तटकरे, आ.भाई गिरकर आ.जयंत पाटील आदी उपस्थित होते.

नागपूरातील तिसरे पावसाळी अधिवेशन

येत्या ४ जुलैपासून नागपूर येथे सुरू होणारे पावसाळी अधिवेशन हे  नागपूरातील तिसरे पावसाळी अधिवेशन ठरणार आहे. यापूर्वी १९६१ साली १४ जुलै ते  ३० ऑगस्ट पर्यंत तर दुसरे पावसाळी अधिवेशन १९६६ साली २९ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत पार पडले होते.

 

Previous articleतर गुटखा माफिया जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाहीत – धनंजय मुंडे
Next articleअॅड. अमित मेहता यांच्यासह भाजपाच्या उमेदवारांना रिपाइंचा पाठिंबा