राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी
आ. राम कदम यांची पोलिसांकडे तक्रार
मुंबई : जळगाव जिल्ह्यात वाकडी गावामध्ये विहिरीत पोहल्यामुळे दोन दलित मुलांना नग्नावस्थेत मारहाण केल्याचा व्हिडिओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून व्हायरल करून त्या मुलांची ओळख उघड करून कायद्याचा भंग केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आ. राम कदम यांनी पोलिसांकडे केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये संबंधित मुले सवर्णांच्या विहिरीत पोहले म्हणून त्यांना मारहाण झाल्याचा चुकीचा व द्वेषपूर्ण उल्लेख करून सामाजिक विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणूनही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आ. कदम यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी या ट्वीटबद्दल माफी मागावी आणि तो डिलिट करावा, अशी मागणी आ. कदम यांनी केली.
आ. कदम यांनी या संदर्भात बुधवारी मुंबईत बांद्रा बीकेसी येथील सायबर पोलीसांच्या कार्यालयात राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात वाकडी येथे विहिरीत पोहले म्हणून अल्पवयीन दलित मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याचा व त्यांची नग्न धिंड काढल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून कायदेशीर कारवाई चालू आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याविषयी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली व त्यासोबत त्या मुलांना मारहाण होतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओ क्लिपमध्ये संबंधित मुलांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. अशा रितीने हिंसाचार व अत्याचाराचा बळी ठरलेल्या बालकांची ओळख जाहीर करणे हा बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (पॉस्को) व बाल न्याय अधिनियम कायदा यानुसार गुन्हा आहे व त्यासाठी कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. राहुल गांधी यांनी संबंधित मुलांची ओळख पटेल अशा रितीने हा व्हिडिओ ट्वीट केल्यामुळे त्यांच्याकडून कायद्याचा भंग झाला आहे. हल्ला झालेल्या मुलांबद्दल राहुल गांधी यांनी संवेदना दाखवली नाही तर उलट आपले राजकारण साधण्यासाठी या घटनेचा उपयोग केला हे निषेधार्ह आहे.
आ. कदम म्हणाले की, राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये असेही म्हटले होते की, सर्वणांच्या विहीरीत पोहल्यामुळे या मुलांना मारहाण झाली. विहिरीच्या मालकाचे आडनाव जोशी असले तरी ते सवर्ण समाजातील नाहीत तर भटके विमुक्त समाजातील आहेत. अशा रितीने राहुल गांधी यांनी चुकीची माहिती पसरवून सवर्ण विरुद्ध दलित असा सामाजिक विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याबद्दलही त्यांच्यावर कारवाई करावी.