संविधानावर शरसंधान करणा-यास उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही : शरद पवार
मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर जर कोण शरसंधान करणार असेल तर त्यांना उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. ही लढाई सोपी नाही परंतु ती लढल्याशिवाय गत्यंतर नाही आणि ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस लढल्याशिवाय थांबणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज संविधान वाचवा, देश वाचवा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी सरकारला हा इशारा दिला. शिवाय त्यांनी आपल्या भाषणामध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यप्रणालीवरही जोरदार टिका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीतूनच संविधानाला धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाचे मंत्री हेगडे यांनी संविधानाविरोधात एक वक्तव्य केले त्यावर त्यांचे ते वैयक्तिक मत होते असे सांगण्यात आले. परंतु ती त्यांची निती होती असा आरोप शरद पवार यांनी करतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर यांचे विचार त्यांनी स्पष्ट केले होते असे सांगितले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील काही शब्दांबाबत शंका निर्माण करतानाच त्या पुस्तकामध्ये घटना ही इतर देशातून उचलून तयार केलेली आहे. ती परदेशाच्या विचारधारेवर आधारीत आहे. त्यामुळे ती आपली म्हणण्याचे कारणच नाही असे म्हटले आहे. याचा अर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घटना मानत नाहीत. त्यांचे इंग्रजीतील वाक्य शरद पवार यांनी वाचून दाखवले आणि त्याचा वरील मराठी अनुवाद सांगितला. हे सांगतानाच त्यांनी यासाठीच जागृत राहण्याची गरज आहे. आता जो आघात होणार आहे तो समाजातील वंचित, शोषित, दलित, अल्पसंख्यांक, ओबीसी, महिला यांच्यावर असणार आहे. सत्तेचा वापर करुन आघात करणारा वर्ग उभा राहतो आहे अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली.
हेगडे यांच्या संविधानाबाबतच्या वक्तव्यावरुन संविधानाची चिंता वाढत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ.बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या घटनेबाबत आसुया आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मार्गदर्शक तत्व, दिशा दाखवण्याचे काम केले आहे. गोळवलकर आणि त्यांच्या असंख्य लोकांनी घटनेबाबत एक वेगळा विचार नव्या पिढीसमोर ठेवत आशंका निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांचा घटनेवर विश्वासच नसल्याचा आरोपही पवार यांनी केला.
शरद पवार यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांचे खास अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सामान्य माणसाचा आधार, सामान्यांचे शक्तीकेंद्र, सामान्यांचा संकटमोचक म्हणजे संविधान असल्याचे प्रतिपादन केले. आपल्या देशाचे संविधान हे जगात वेगळं आहे म्हणून बाहेरच्या देशांनी स्वागत केले. मात्र ज्या देशात संविधान आहे त्या देशांमध्ये संविधानाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला मात्र आपल्या देशात संविधानाला धक्का देण्याचा प्रयत्न झाला तरी शेवटचा सामान्य माणूस पेटून उठतो ही संविधानाची ताकद असल्याचेही पवार म्हणाले.
इंदिरा गांधींनी सामान्य माणसांसाठी काम केले परंतु त्यांनी १९७७ मध्ये घटनेचा वापर करत आणीबाणी लागू केली. त्याच इंदिरा गांधींसारख्या प्रभावी नेत्याला धक्का बसला. ही संविधानाची ताकद आहे. आणीबाणीमुळे इंदिरा गांधींना बाजुला व्हावे लागले. मात्र चार वर्षात उपेक्षित घटकांवर, दलित, अल्पसंख्यांक, ओबीसी, महिला यांच्यावर अत्याचारांचे प्रमाण वाढलेले आहे. सरकारविरोधी भूमिका पटली नाही तर त्यांच्यावर हल्ले करणे, गोमांस नसतानाही ते गोमांस आहे असे दाखवून हल्ले केले गेले. त्यावेळी राज्यकर्त्यांनी कडक भूमिका घेतली नाही. अशी शेकडो उदाहरणे आहेत असेही शरद पवार म्हणाले.गोध्राप्रकरण जगात गाजले. त्यामध्ये हत्या झाल्या. कुणी कुणाची केली त्याचे समर्थन करणार नाही परंतु त्या घटनेचा निषेध नक्कीच करावा तेवढा थोडा आहे. गुजरातमध्ये आग लावण्याचे काम झाले. कसुर नसलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे सगळं घडतंय आणि घडत होतं. ते नरेंद्र मोदी ज्या राज्याचे नेतृत्व करत होते तिथे आणि त्याच मोदींकडे आज देशाचे नेतृत्व आहे. त्यामुळे याचा विचार करण्याची गरज आहे असेही पवार म्हणाले.
२५ वर्षापूर्वी महिला धोरण आणले.त्या महिला धोरणाला दिशा दिली. त्यामध्ये काही कमतरता आढळली त्यात सुधारणा करण्यात आली. परंतु आज सत्ता आहे त्यांना त्याबद्दल आस्था नाही. आम्ही संविधानाचा विचार करतोय. संविधानाबाबत जागृती करतोय. तेवढाच विचार महिलांचा करतोय.त्यामुळे आता या सरकारला महिलांच्या धोरणावर विचार करायला भाग पाडले पाहिजे असेही पवार म्हणाले.
कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे असतो हे आता मागे पडू लागले आहे. महिलांना मक्ता मिळाला तर त्याही कर्तृत्व दाखवतील असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.