डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२० मध्ये पूर्ण होणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२० मध्ये पूर्ण होणार

राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : इंदू मिल येथील साडेबार एकर जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून १४ एप्रिल २०२० रोजी स्मारकाचे काम पूर्ण होईल, असा ठाम विश्वास सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बांधकामाचा आढावा बैठकीस तसेच कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी बडोले यांनी इंदू मिलच्या जागेवर आज भेट दिली. कामांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. इंदूमिलच्या संपूर्ण साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले असून सदर जमिनीचा सातबारा महाराष्ट्र शासनाच्या नावावर असून त्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेली आहे. फार पूर्वीच इंदू मिलच्या जून्या बांधकामाचे पाडकामही पूर्ण झाले. स्मारकाच्या उभारणीसाठी निवीदा प्रक्रिया पूर्ण होऊन मे. शापूर्जी पालनजी कंपनीला काम मिळाले असून बांधकामाला प्रत्यक्ष सुरूवातही झालेली आहे. आतापर्यंत १३४ शोअर पाईल्सचे काम पूर्ण झालेले आहे, असे वास्तव असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते या प्रश्नावर राजकारण करून आंबेडकरी अनुयायांमध्ये संभ्रम पसरविण्याचे काम करीत आहे. मात्र आम्हाला परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे करायचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे १४ एप्रिल २०२० मध्ये या स्मारकाचे काम आम्ही पूर्ण करणारच असे बडोले यावेळी म्हणाले.

स्मारकाचे काम जलदगतीने पूर्ण होईल, निधीची कुठेही कमी पडणार नाही. संपूर्ण स्मारकाच्या उभारणीचा ७६३ कोटी रूपयांचा खर्च आहे. यावर्षीच्या कामासाठी १५० कोटी रूपयांची तरतूदही करण्यात आलेली असल्यामुळे कामात कोणताही अडथळा येणार नाही, नियोजित वेळेतच प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, असे बडोले यावेळी म्हणाले.

Previous articleमराठी ‘विकास आराखड्यासाठी’ विखे पाटील मुंबई उच्च न्यायालयात
Next articleविधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैला निवडणूक