हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे –धनंजय मुंडे

हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे –धनंजय मुंडे

मुंबई : पीक कर्जाच्या बदल्यात बँक मॅनेजरने शेतक-याच्या पत्नीकडे केलेली शरीरसुखाची मागणी, ही बातमी ऐकुण तळपायाची आग मस्तकाला जात आहे. अशा सरकारचा कडेलोट केला पाहीजे, त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे. अशा शब्दात विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलच फैलावर घेतले आहे.

मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरने पिककर्ज मंजुर करण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यावर धनंजय मुंडे यांनी अतिशय जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहिले आहे.

पुरोगामी व प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात अशी घटना घडणे गंभीर, दुर्दैवी, लाजीरवाणे आहे. अन्नदात्या शेतकऱ्यांसाठी पिककर्ज मिळवणे हे दिव्य असून त्यासाठी त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागते याचे दाहक वास्तव बुलडाण्याच्या घटनेतून समोर आले आहे. पिककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे सरकारने आतापर्यंत सातत्याने संशयाच्या दृष्टीकोनातून पाहिले, परंतु त्यांची पिककर्जे मंजूर का होत नाहीत, कर्जमाफी होऊनही त्यांना कर्जमाफीची रक्कम वेळेवर का मिळत नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बँकिंग व प्रशासकीय व्यवस्थेतील अशा दुष्प्रवृत्तींमध्ये दडलेली आहेत, याची जाणीव या घटनेच्या निमित्ताने आपल्याला झाली असल्याचे पत्रात म्हटले आहे.

आमच्या शेतकरी भगिनीच्या अब्रूला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. अशा नीतीभ्रष्ट नराधमांना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. महाराष्ट्रात रामराज्य आणण्याचे आश्वासन देऊन सरकार सत्तेवर आले होते. परंतु गेल्या ४ वर्षांच्या कारकिर्दीत राज्यातील शेतकऱ्यांची शासकीय व्यवस्थेकडून पावलापावली होत असलेली अडवणूक, त्यांचा नाहक सुरु असलेला छळ, शेतकऱ्यांच्या कुटुंबावर ओढवलेली हलाखीची स्थिती, आता तर शेतकऱ्याच्या पत्नीच्या अब्रूवर टाकण्यात आलेला घाला पाहिल्यानंतर सरकार रामराज्य आणू शकले नाहीत, हे उघड आहे. परंतु, पोखरलेल्या, नितीभ्रष्ट व्यवस्थेमुळे महाराष्ट्रातील जनता सध्या ‘हराम’ राज्याचा अनुभव घेत जगत आहे, असंच दुर्दैवानं म्हणावं लागेल असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

विद्यमान राज्य सरकारचा एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. किमान आतातरी आपल्याकडून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्याकडे संशयाने बघणे थांबवावे. शेतकऱ्यांच्या पत्नी, आया, बहिणी, मुलींकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचे डोळे काढण्याचे साहस आपण दाखवावे, राज्यातील जनता एकवेळ सर्व त्रास सहन करेल, परंतु आया-बहिणींच्या अब्रुवरील घाला कदापिही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

बुलडाण्यातील शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या संबंधीत बँक अधिकाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या तसेच राज्यातील जनतेच्या असहायतेचा गैरफायदा घेणाऱ्या बँकिंग तसेच शासकीय यंत्रणेतील कार्यभ्रष्ट, नीतीभ्रष्ट अधिकाऱ्यांना वेळीच वठणीवर आणण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.

Previous articleबुलढाण्याची घटना महाराष्ट्राला कलंकीत करणारीः खा. अशोक चव्हाण
Next articleबुलढाणा सेंट्रल बँक प्रकरण : अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी पाठपुरावा