शिवसेना की भाजपा बाजी मारणार :  निकाल उद्या

शिवसेना की भाजपा बाजी मारणार :  निकाल उद्या

मुंबई :  मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या गुरुवार २८ जूनला होणार आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी नेरुळच्या सेक्टर २४ मधील पाम बीच रोडवरील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. शिवसेना आणि भाजपाने या निवडणूका स्वबळावर लढविल्याने मुंबईसह, कोकणात आणि नाशिकमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणूकीचे मतदान मतपत्रिकेवर झाल्याने मतमोजणीस वेळ लागून दुपार नंतर या निवडणूकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या  गुरुवार २८ जूनला होत आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधरची मतमोजणी नेरुळच्या सेक्टर २४ मधील पाम बीच रोडवरील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून भारत निवडणूक आयोगाने  तसेच महसूल यंत्रणेने प्राधिकृत केलेल्या व्यक्तींनाच फक्त या इमारतीत प्रवेश असणार आहे.

सांस्कृतिक भवनाच्या पहिल्या मजल्यावर मुंबई शिक्षक तर दुसऱ्या मजल्यावर कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधरची मतमोजणी होणार आहे. तुलनेने कोकण पदवीधर मधील मतदारांची संख्या लक्षात घेऊन याठिकाणी मतमोजणी सुव्यवस्थित व वेगाने होण्यासाठी २८ टेबल्स मांडण्यात आले आहेत. याशिवाय यावेळेस काही सूक्ष्म निरीक्षक देखील मतमोजणीवर लक्ष ठेवून असणार आहेत.पसंतीक्रम पद्धतीचे मतदान असल्याने उमेदवाराला विजयी होण्यासाठी  विशिष्ट फॉर्म्युलाद्वारे आवश्यक कोटा निश्चित करण्यात येतो त्यानुसार सर्व उमेदवारांना मिळालेली मते मोजली जातात.

मुंबई शिक्षक मतदारसंघात ८ हजार ३५३ मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी ८२.१३ आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात ३७ हजार २३७ मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी ५२.८१ तर कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण ७५ हाजार ४३९ मतदारांनी मतदान केले होते  त्याची टक्केवारी ७२.३५ आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात ४९ हजार ७४२ एवढे मतदान झाले  असून, त्याची  ९२.३० टक्केवारी आहे.

मुंबई पदवीधर मतदार संघातुन शिवसेनेचे विलास पोतनीस, भाजपाचे अॅड.अमित मेहता, आघाडी आणि शेकापचे अॅड. राजेंद्र कोरडे, अपक्ष उमेदवार दिपक पवार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि मनसेचे पुरस्कृत उमेदवार राजू बंडगर यांच्यासह,१२ उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई शिक्षक मतदार संघात लोकभारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील, भाजपा पुरस्कृत अनिल देशमुख आणि शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यासह एकूण १० उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत. कोकण पदवीधर मतदार संघात भाजपाचे निरंजन डावखरे, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात खरी लढत आहे.नाशिक शिक्षक मतदार संघात भाजपाचे अनिकेत पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, आघाडी पुरस्कृत संदिप बेडसे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात आहेत.या निवडणूका शिवसेना आणि भाजपाने स्वबळावर लढविल्याने या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाना लागली आहे.

 

Previous articleमुख्यमंत्री तुम्हाला खात सांभाळता येत नसेल तर चालते व्हा
Next articleकिराणा वस्तूंच्या किरकोळ पॅकिंगवरील प्लास्टिक बंदी उठवली