उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी न चढण्याचा आदेश द्यावा

उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी न चढण्याचा आदेश द्यावा

नवाब मलिक यांचे आव्हान

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे नाणारमध्ये जावून नाणार प्रकल्प रद्द झाल्याचे जाहीर करतात आणि दुसरीकडे भाजपचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान नाणार प्रकल्पाचा करार करतात ही जनतेची दिशाभूल असून भाजप मंत्र्यांना मातोश्रीची पायरी चढू दिली जाणार नाही असे सांगण्यापेक्षा हिंमत असेल तर उध्दव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू नका असा आदेश द्यावा असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज दिले दिले.

शिवसेना नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा करते आणि दुसरीकडे भाजपचे मंत्री नाणार प्रकल्पाचा करार करते या भूमिकेवर मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला.राज्याचे उदयोगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाणारमध्ये जावून नाणार प्रकल्प रद्द केल्याची घोषणा केली होती. परंतु असे असतानाही केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ३ लाख कोटीच्या नाणार प्रकल्प करारावर सही केली. त्यानंतर शिवसेनेने भाजप मंत्र्यांना मातोश्रीची दारे बंद असल्याचे स्पष्ट केले.नाणार रद्द झाला असताना प्रधान यांनी करार केला कसा असा सवाल करतानाच नाणार प्रकल्पाबाबत जनतेची दिशाभुल केली जात असल्याचा आरोपही मलिक यांनी केला.मातोश्रीच्या पायऱ्या भाजप मंत्र्यांनी कधी चढायच्या हे उध्दव ठाकरे यांनी ठरवावे परंतु आपल्या मंत्र्यांनी मंत्रालयाच्या पायऱ्या कधी चढू नये याची घोषणा ते कधी करणार हे लवकरच जाहीर करावे अन्यथा त्यांनी पायऱ्यांचे नाटक बंद करावे असा सल्लाही मलिक यांनी दिला.

नाणार प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करताना कोकणाला दुषित करणारा रासायनिक प्रकल्प नको आहे. कोकणातील जनतेला प्रदुषित प्रकल्प नको असेल तर सरकारने जमिनी घेण्याची आणि प्रकल्प लादण्याची जबरदस्ती करु नये असे सांगतानाच गुजरातच्या भाजप नेत्यांनी सर्वाधिक जमिनी नाणार प्रकल्पाच्याठिकाणी खरेदी केल्या असून त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांचा  राजीनामा घ्यावा.मंत्री म्हणून राजीनामा घेता येत नसेल तर त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी र मलिक यांनी केली.लातुरमध्ये शैक्षणिक क्लासेस चालवणाऱ्या अविनाश चव्हाण यांची गोळया झाडून हत्या झाली. त्या हत्ये प्रकरणी कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांच्या अंगरक्षकाला अटक करण्यात आली. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत कामगारमंत्री संभाजी निलंगेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर तोफ डागली.राज्यात मंत्र्यांच्या माध्यमातून गुंडाच्या टोळया काम करत असून, मुख्यमंत्र्यांनी जंगलराज निर्माण केल्याचा गंभीर आरोपही मलिक यांनी केला.

संभाजी निलंगेकरांचा अंगरक्षक करणसिंह याला अटक झाल्यावर मंत्री निलंगेकर यांनी मी त्याला ओळखत नाही असे सांगितले. परंतु त्यांच्यासोबतचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी तो माझा अंगरक्षक नाही  आणि तो पक्षातही नाही असे स्पष्टीकरण दिले. मात्र मंत्री असे बोलून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करतानाच  मलिक यांनी करणसिंह याचे निलंगेकरांसोबत असलेले फोटो माध्यमांना दाखवले.पत्रकार परिषदेमध्ये करणसिंह याच्याकडे कारबाईन कशी आली, ही कारबाईन त्याच्याकडे आली कुठुन, मंत्रीमहोदयांच्या बंगल्याबाहेर ही कारबाईन घेवून त्याने फोटो काढले आहेत. अशा किती कारबाईन आहेत असे प्रश्न उपस्थित होत असल्याचेही  मलिक म्हणाले.

 

Previous articleविलास पोतनीस कपिल पाटलांच्या विजयाची औपचारिकता बाकी
Next articleप्लास्टिक बंदीला स्थगिती देण्याची भाजपची मागणी