प्लास्टिक बंदीला स्थगिती देण्याची भाजपची मागणी

प्लास्टिक बंदीला स्थगिती देण्याची भाजपची मागणी

मुंबई :  प्लास्टिक बंदीच्या मुद्यावर शिवसेनेला मनसेने लक्ष केले असतानाच आता प्लास्टिक बंदीवरून शिवसेना भाजपात जुंपली आहे. प्लास्टिक बंदी मुळे सामान्य जनतेला त्रास होत असून,व्यापाऱ्यांवर जाचक दंड लावला जात असल्याने या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे .

भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून, प्लास्टिकला पर्याय उपलब्ध होईपर्यंत  किंवा ३१ डिसेंबर २०१९  पर्यंत प्लास्टिकचे पूर्ण विघटन कार्यक्रम जाहीर करेपर्यंत  स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे . मुंबई महानगरपालिका प्लास्टिकला कोणताही पर्याय देत नसताना व्यापाऱ्यांवर पाच हजार रुपये दंड आकारला जात आहे. हा एक प्रकारचा अन्याय  असल्याचे आ.पुरोहित यांनी म्हटले आहे . सरकारच्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात प्रचंड असंतोष असल्याचे पुरोहित यांनी सांगितले.सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे छोटे व्यापारीही  भरडले जात असून मासे आणि मटन विक्रेते ही त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले .

सध्या राज्यात कोणत्याही महानगरपालिकेत प्लास्टिक रिसायकल संदर्भात यंत्रणा नाही किंवा याबाबत कारवाई करण्यासाठी स्वतंत्र विभाग नाही . पर्यावरणाच्या दृष्टीने घेतलेल्या  निर्णयाचे आम्ही स्वागत करतो . मात्र कोणत्याही पर्यायाशिवाय घेतलेला निर्णय लागू  करणे अतिशय अवघड असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे . त्याचबरोबर राज्य सरकारने प्लॅस्टिकच्या नियंत्रणाबाबत महाराष्ट्र प्लास्टिक डॅमेज कंट्रोल ऑथॉरिटी चे निर्माण करावे अशी मागणी ही पुरोहित यांनी केली आहे .

दरम्यान प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केल्यानंतर आता भाजप नेत्यानेही  ही शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या पर्यावरण खात्याने घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे . प्लास्टिक बंदीबाबत राज्यात खळबळ उडाली  असतानाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपली भूमिका अद्याप मांडलेली नाही ,त्यामुळे मुख्यमंत्रीही ही वेट अँड वॉच भूमिकेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे .

Previous articleउद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी न चढण्याचा आदेश द्यावा
Next articleमुंबई पदवीधरमधून शिवसेनेचे विलास पोतनीस विजयी