मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सहमतीने १६०० कोटींचा घोटाळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सहमतीने १६०० कोटींचा घोटाळा

संजय निरूपम यांचा खळबळजनक आरोप

मुंबई : नवी मुंबईतील सिडकोतील जमिनीच्या व्यवहारावरून काँग्रेसने आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. सोळाशे कोटीच्या  २४ एकर जमिनीचा केवळ तीन कोटी रूपयांत व्यवहार केल्याचा आरोप मुंबई कॅांग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. या घोटाळ्यात काही मंत्री आणि  अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे सांगून,या घोटाळ्याची खुली चौकशी करावी तसेच हा व्यवहार रद्द करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला  उपस्थित होते. सिडकोमधील २४ एकर जमिनीचा व्यवहार झाला असून, सुमारे १ हजार ६०० कोटी रुपये किंमतीची ही जमीन केवळ तीन कोटी रुपयांना मनिष मखिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आली. मनीष भतिजा हा भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप  निरुपम यांनी या पत्रकार परिषदेत केला.संजय भालेराव हे प्रसाद लाड यांचे मित्र असून,आ. प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांचे व्यवसायिक सहकारी असून, आ.लाड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांच्या संमतीने हा व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

कॅांग्रेसवर ५०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार- भाजपा

दरम्यान कॅांग्रेसने केलेले सर्व आरोप भाजपाने फोटाळले असून, कॅांग्रेसकडून लोकांची दिशाभूल केली जात असून, त्यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगून, कॅांग्रेसच्या नेत्यांवर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी आज घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

Previous articleरजनीकांतची पत्नी लता यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
Next articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर