सामाजिक बांधिलकीमुळेच बुलडाणा अर्बनची घोडदौड : नितीन गडकरी
मुंबई : विदर्भातील अविकसित आणि अपरिचित अशा बुलडाणा जिल्ह्यात ३२ वर्षांपूर्वी बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीची स्थापना झाली. त्या सोसायटीच्या कामाचा पसारा आज महाराष्ट्रात आणि इतर राज्यांत वाढला तो केवळ सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक म्हणजेच भाईजी यांच्या सामाजिक बांधिलकीमुळेच, असे गौरवोद्गार केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या दादर शिवाजीपार्क शाखेचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यामित्त स्वा. विनायक दामोदर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी गडकरी यांनी स्मार्ट व्हॉल्ट या अत्याधुनिक लॉंकर्सचेही उद्घाटन केले. याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राज्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, शिवसेना नेते, खासदार आणि को आँपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज फेडरेशन चे अध्यक्ष आनंदराव अडसूळ आदी उपस्थित होते.
लोकहिताची कामे करताना राजकारण बाजूला ठेवून सामाजिक भान ठेवून काम केल्यास यश हमखास पदरी पडते, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राधेश्याम चांडक यांची कार्यपद्धती हीच आहे. बुलडाणा अर्बनने लोकांच्या आर्थिक समस्यांकडे लक्ष देतांना आणि त्यांच्याकडे कौटुंबिक नात्याने पाहतांना शैक्षणिक, आरोग्य तसेच शेतक-यांच्या धान्याची साठवण करण्यासाठी गोदामांची निर्मिती केली हे योगदान मोलाचे असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राकडे आकसाने पाहू नये याकडे गडकरी यांचे लक्ष वेधले. सहकारी बँका ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असून केंद्रातील मंत्री त्याकडे गावंढळ आणि अशिक्षित लोकांचा व्यवहार हा दृष्टिकोन ठेवून त्याकडे पाहिले जाते, याबद्दल त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त करत सहकार क्षेत्रातील चुका सुधारता येतील पण तिला उद्धवस्त करणे कोणाच्याच हिताचे नसल्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
शिवसेना नेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांचे कार्य मंत्री, खासदार, आमदार यांच्यापेक्षा मोठे असून त्यांनी राजकारणात येण्याचा विचार करू नये आणि तो त्यांचा स्वभावधर्म नाही. आमदार निवडून येण्यासाठी तीन लाख लोकांचे मतदान असते, परंतु बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून भाईजी साडे सात लाख लोकांच्या हृदयात आहेत. आज भाईजींच्या समोर मंत्र्यांची आणि राजकीय नेत्यांची मांदियाळी आहे, असे सूचक विधान करून अडसूळ यांनी राधेश्याम चांडक यांच्या कार्याचा गौरव केला.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी बुलडाणा अर्बनने शेतक-यांच्या धान्य साठवणूकीचा प्रश्न लक्षात घेऊन शाखा तिथे गोदामे ही योजना यशस्विरित्या राबवली. राज्य सरकारला गोदामांची गरज भासेल तेव्हा भाईजींची गोदामे भाड्याने घेण्यास सरकार प्राधान्य देईल, असे यावेळी स्पष्ट केले.
प्रारंभी बुलडाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांनी बुलडाणा अर्बनने १९८६ पासून सहकारी चळवळीतून समृद्धीचा मैलाचा दगड गाठला. नऊ राज्यातून ४२२ शाखा, ५ हजार ८०० कोटींच्या ठेवी आणी १० हजार कोटींची उलाढाल असा संस्थेचा विस्तार असल्याचे सांगून पारदर्शी आर्थिक व्यवहाराला विधायक समाजकार्याची जोड देत आज प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचे सांगितले. जपाने वरिष्ठ अधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित होते. स्वर संगीत मेजवानीही यावेळी सादर करण्यात आली होती.










