महाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये भाजपाची दमदार एन्ट्री

महाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये भाजपाची दमदार एन्ट्री

मुंबई  :  महाराष्ट्र स्टेट को -ऑप हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देत भाजपाप्रणित सहकार पॅनेलने दमदार एन्ट्री केली आहे. राज्य सहकारी संघाच्या वर्चस्वानंतर, मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलने आणखी एका शिखर संस्थेमध्ये शिरकाव करून सहकार क्षेत्रात आपली जोमदार वाटचाल सुरू ठेवली आहे.

सहकार पॅनेलचे नाशिक विभागातून आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते बिनविरोध, तर मुंबई विभागातून सीताराम बाजी राणे, दत्तात्रय शामराव वडेर आणि नागपूर विभागातून राकेश मुकुंदराव पन्नासे विजयी झाले आहेत. महाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते.  हे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी दोन्ही काँग्रेसनी आघाडी केली होती. या आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील, तर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या दिग्गज नेत्यांनी केले होते. तरीही शह देण्याचे काम भाजपने केले.  या आघाडीविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार प्रवीण दरेकर, आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते आणि सहकारातील जेष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल स्थापन करण्यात आले होते.  भाजपाप्रणित सहकार पॅनेलने जोरदार यश मिळवीत, २१ पैकी ५ जागा पटकाविल्या आहेत. त्यामुळे सहकार पॅनेलचा हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये प्रवेश झाला आहे.

“या निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला अत्यल्प मताने विजय मिळाला आहे. केवळ २०० मतांचा फरक आहे. त्यापैकी १०० मते जरी सहकार पॅनेलला मिळाली असती तर चित्र बदलले असते. तरीही या संस्थेवरील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व पाहता,  सहकार पॅनेलला मिळालेले यश  मोठे आहे. सहकार पॅनेलला सहकार्य करणाऱ्या राज्यातील सर्व मतदारांचे आम्ही आभारी आहोत,” असे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

Previous article..आणि विधानभवनात अवतरले…संभाजी भिडे 
Next articleमहादेव जानकर  विजय गिरकर यांना भाजपाची उमेदवारी