आ. प्रसाद लाड यांनी काँग्रेस नेत्यांवर ठोकला ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

आ. प्रसाद लाड यांनी काँग्रेस नेत्यांवर ठोकला ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई : नवी मुंबई येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असलेल्या भुखंडाच्या खरेदी विक्रीशी काहीही संबंध नसताना निव्वळ राजकीय हेतुने प्रेरित होऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्यावर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.  काँग्रेसच्या या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. लाड यांच्यावर नवी मुंबई येथील भुखंड खरेदीसाठी बेकायदेशीरपणे बिल्डरला मदत केल्याचा आरोप केला होता. त्या अनुषंगाने लाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात हा दावा दाखल केला आहे.

काँग्रेस नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवी मुंबई येथील नियोजित विमानतळाजवळील २४ एकरचा भुखंड अवघ्या ३ कोटी ६० लाख रुपयांत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या निकटवर्तीय बिल्डरला दिल्याचा  आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला होता. तसेच हा भुखंड सध्याच्या बाजारभावानुसार तब्बल १६०० कोटींचा असल्याचा  दावाही या पत्रकार परिषदेत करण्यात आला होता. मुळात या या आरोपाला कोणताही आधार किंवा पुरावे नसताना माझ्यावर आणि  मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर फक्त वातावरण निर्मितीसाठीचा काँग्रेसचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे सांगत लाड म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढले हा काही कोणताही घोटाळा केल्याचा पुरावा असू शकत नाही. माझी अनेक नेत्यांशी आणि व्यावसायिकांशी मैत्री आहे, याचा अर्थ मी त्यांच्या व्यवसायात भागिदार आहे असा होत नाही, तरीही आरोपांबाबत कोणतीही खातरजमा न करता निव्व्ळ मानसिक त्रास देण्याच्या हेतुने, तसेच सामाजिक पत घसरवून माझ्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का देण्याच्या दुष्ट हेतूने हे आरोप करण्यात आले आहेत. या शिवाय माझ्यावरील आरोपाच्या माध्यमातून सरकारच्या प्रतिमेला धक्का देण्याचाही हा प्रयत्न आहे. त्यामुळे नाईलाजास्तव मला हा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा लागत आहे. या दाव्याबाबत काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावण्यात येणार असून, ही नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत त्याबाबतचा खुलासा करावा. किंवा २ जुलै रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील वक्तव्ये आणि आरोप बिनशर्त मागे घेऊन माझी तसेच राज्य सरकारची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे असे खुले आव्हान आमदार प्रसाद लाड यांनी दिले आहे.

Previous articleमहादेव जानकर  विजय गिरकर यांना भाजपाची उमेदवारी
Next articleविकोगर्ल मिष्टी चक्रवर्ती संजीव पेंढरकरांच्या हस्ते सन्मानित