पोषण आहारात दूध व दूध भुकटीचा समावेश : जानकर

पोषण आहारात दूध व दूध भुकटीचा समावेश : जानकर

दुग्ध व्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांची माहिती

नागपूर  : दूध व दूध भुकटी निर्यात करणाऱ्या उत्पादकांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्याबरोबरच शालेय पोषण आहार योजनांमध्ये दूध किंवा दूध भुकटीचा समावेश करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती दुग्ध व्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

या संदर्भात केलेल्या निवेदनात  जानकर म्हणाले, काल विधानसभेत दुधाच्या प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. यावेळी चर्चेदरम्यान दुधाच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय करण्याबाबत घोषणा सभागृहात करण्यात आली होती. त्यानुसार आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयात दूध भुकटीची निर्यात करणाऱ्या उत्पादकांना पुढील दोन महिन्यात निर्यात केलेल्या दूध भुकटीसाठी प्रतिकिलो ५० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील जे दूध प्रकल्प दुधाची निर्यात करतील त्यांनाही प्रतिलिटर पाच रुपये प्रोत्साहनपर अनुदान पुढील दोन महिन्यांकरिता देण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पोषण आहार योजनांमध्ये दूध किंवा दूध भुकटीचा समावेश करण्याबाबत धोरणात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दुधाच्या उपपदार्थांना अधिक मागणी मिळावी यासाठी तूप तथा लोणी यावरील जीएसटी कमी करण्यासंदर्भात केंद्र शासनाला शिफारस करण्याबाबत या बैठकीत निर्णय झाला.

बैठकीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री अजित पवार, शरद रणपिसे, गणपतराव देशमुख, राजेश टोपे, मधुकर चव्हाण, हसन मुश्रीफ, सुरेश धस, चंद्रदीप नरके, राहुल मोटे, सत्यजित पाटील, मनोहर भोईर आणि महानंदचे अध्यक्ष मंदाकिनी खडसे हे उपस्थित होते.

Previous articleनाणार प्रकल्प लादणार नाही : मुख्यमंत्री
Next articleहिंमत असेल तर गाव-खेड्यात जाऊन दीडपट हमीभावाची वल्गना करून दाखवा!