दुस-या दिवशीही “नाणार जाणार”
दिवसभरासाठी कामकाज तहकूब
नागपूर : कोकणातील नाणार प्रकल्पाचा मुद्दा सलग दुस-या दिवशी विधानसभेत गाजला. विरोधक या मुद्द्यावर आक्रमक होताच सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचे सदस्यही आक्रमक झाल्याने सभागृहात प्रचंड गोंधळ झाल्याने पाच वेळा कामकाज तहकूब करावे लागले. विरोधकांसह शिवसेनेने हा मुद्दा लावून धरल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. विधानपरिषदेतही नाणारच्या मुद्द्यावर गोंधळ झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. विधानसभेत झालेल्या गोंधळातच विधेयके मंजूर करण्यात आली.
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत नाणार प्रकल्पाबाबत नियम ५७ आणि ९७ अन्वये स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. सभागृहाचे उर्वरित कामकाज स्थगित करून नाणार प्रकल्पाबाबत चर्चा घ्यावी आणि हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी त्यांनी या प्रस्तावाच्या माध्यमातून मांडली. सरकारने चर्चा न केल्यास सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर विरोधी पक्षांचे सदस्य प्रचंड आक्रमक झाले होते.
नाणारच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत वेल मध्ये उतरून प्रचंड घोषणाबाजी केली. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत घोषणाबजी केली. विरोधकांच्यासह शिवसेनेच्या सदस्यांनी केलेल्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज तब्बल पाच वेळा तहकूब करावे लागले.सभागृहात झालेल्या गदारोळात विधेयके मंजूर करण्यात आल्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.विधानपरिषदेतही याच मुद्द्यावरून गोंधळ झाल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
आज कामकाज सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देत जोरदार आंदोलन केले. नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, नाणार प्रकल्पात सुरु आहे मांडवली,खरं सांगा किती मिळाली दलाली, म्हणे नाणार जाणार,नाणार जाणार, खोटं बोलणं सोडायला सांगा तुम्ही किती घेणार, या सरकारचं करायचं काय,खाली डोकं वर पाय, पीक विम्याची नुकसान भारपाई मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, फेकू सरकार हाय हाय अशा घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला.