भगवत गीतेच्या संचाचे वाटप शासनामार्फत नाही: तावडे
नागपूर : भक्ती वेदांत बुक ट्रस्ट, भिवंडी यांच्या मार्फत श्रीमद भगवत गीता संचाच्या १८ खंडाचे वाटप महाविद्यालयांना करण्यात आले आहे. यामध्ये शासनाचा काहीही संबंध नाही. भगवत गीतेच्या संचाचे वाटप शासनामार्फत करण्यात आलेले नाही, ज्या भगवतगीतेचे वाटप महाविद्यालयांना करण्यात आले आहे, ते मोफत करण्यात आले आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
भक्तीवेदांत ट्रस्ट यांनी भगवतीगीतेचा संच राज्य शासनाने महाविद्यालयांमध्ये मोफत वाटप करावेत, असा प्रस्ताव दिला होता, परंतु शासनाने भगवतगीतेचे मोफत संच हे शासनामार्फत नव्हेत ट्रस्टमार्फतच महाविद्यालयांना वाटप करवीत, असे स्पष्ट केले. भगवतगीतेचे संच महाविद्यालयामध्ये वाटप करण्याबाबत कोणतेही परिपत्रक अथवा पत्रक शासनाने काढलेले नाही. केवळ महाविद्यालयांची यादी भक्तीवेदांत ट्रस्टला उपलब्ध करुन देण्यात आली. त्यानुसार या ट्रस्टने महाविद्यालयांना भगवतगीत संचाचे मोफत वाटप केले. तसेच यासाठी शासनाने स्वत:हून ट्रस्टला कोणतेही पैसे दिलेले नाहीत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेस,राष्ट्रवादी आणि समाजवादी विचारसरणीचे आमदार याबाबत चुकीचा प्रचार करत असून, भगवतगीता वाईट आहे आणि त्याचे वाटप करु नये, असे त्यांनी जाहीर करावे. त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु असे सांगतानाच तावडे म्हणाले की, जर कोणी कुराण, बायबलचे वाटप करण्याची विनंती केली, तर त्यासाठीही परवानगी देण्यात येईल.