मराठीच्या पुस्तकात गुजराती भाषेचे धडे !
नागपूर : सहावीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती धडे छापल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनिल तटकरे यांनी समोर आणल्यानंतर विधानपरिषदेमध्ये जोरदार रणकंदन माजले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उचलून धरल्यामुळे सभागृह दोनवेळा तहकुब करावे लागले आणि सभापतींनी सरकारला खुलासा करण्याचे निर्देश दिल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न उचलून धरल्यामुळे शेवटी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.
विधानपरिषदेमध्ये औचित्याच्या मुद्दयाद्वारे आमदार सुनिल तटकरे यांनी इयत्ता सहावीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती धडे असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे पहिल्यावेळी कामकाज तहकुब झालं. मात्र त्यानंतर सभागृह सुरु झाल्यानंतर सभागृह नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी असे पुस्तकच नाही असा दावा केल्यामुळे सभागृहात गदारोळ झाला त्यामुळे पुन्हा १५ मिनिटासाठी सभागृह तहकुब झाले.
त्यानंतर सभागृह सुरु झाल्यावर सभागृहनेते चंद्रकांतदादा पाटील यांनी माझ्याकडे सहावीचे भूगोल पुस्तक आहे परंतु त्या पुस्तकात एकही गुजराती पान नाही आणि हे पुस्तक जुनमध्ये छापण्यात आले आहे त्यामुळे आमदार सुनिल तटकरे यांना जर असे काही सापडले असेल तर त्यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच का सादर केले नाही असा मुद्दा उपस्थित करुन आणखी वाद निर्माण करुन दिला. त्यामुळे सभागृहात आणखी गोंधळ सुरु झाला.
तात्काळ विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करत या पुस्तकाबाबत सभागृह नेत्यांनी शंका निर्माण केली आहे. या पुस्तकाच्या एक लाख प्रती गुजरातमधील श्लोक प्रिंट अहमदाबाद कंपनीकडून छापून घेतल्या असल्याचे सांगितले. हा आमच्या महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या अस्मितेचा प्रश्न असून भूगोल पुस्तकामध्ये १५ गुजराती पाने आली कशी असा सवाल केला.
गुजरातच्याबाबतीत लाचार व्हा परंतु महाराष्ट्रातील माणूस कधीही गुजरातपुढे लाचार होणार नाही असा इशारा सरकारला दिला. त्यामुळे राज्यसरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी व जाहीर खुलासा करावा अशी मागणी केली.शिवाय काँग्रेस आमदार भाई जगताप यांनीही हा मुद्दा लावून धरला.
त्यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर यांनी जे घडले आहे ते विद्यार्थ्यांच्यादृष्टीने घातक आहे. दादा हा अस्मितेचा महत्वाचा मुद्दा जितका महत्वाचा आहे तितकाच तो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे मी सोमवारपर्यंत राज्यसरकारने यावर सखोल खुलासा करावा असे निर्देश दिले असल्याचे स्पष्ट केले.
मात्र त्यानंतर आमदार सुनिल तटकरे यांनी सभागृह नेत्यांनी हे पुस्तक बाहेरुन छापून आणले असावे अशी शंका व्यक्त केली . मी माझ्या ३०-३५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असे घाणरडे राजकारण केले नाही. मी एकवेळ या सभागृहात विष घेवून आत्महत्या करेन परंतु असे काम कधी करणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर सभागृहात सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यानंतर सभागृहात घोषणा सुरु झाल्या त्यामुळे शेवटी सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.