उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव

विधेयक एकमताने मंजूर

नागपूर : जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याबाबतच्या विधेयकाला आज विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याबाबत विधेयक सभागृहात मांडले. त्यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, गणपतराव देशमुख, शशिकांत शिंदे, संजय सावकारे, ज्ञानराज चौघुले, छगन भुजबळ, हर्षवर्धन सपकाळ, अजित पवार, मंदा म्हात्रे, दिलीप वळसे-पाटील, हरिभाऊ जावळे यांनी चर्चा करीत बहिणाबाईंच्या काव्य प्रतिभेचे स्मरण करीत सूचना केल्या.

विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना  तावडे म्हणाले, या विधेयकाला एकमताने पाठिंबा दिल्याबद्दल मी सभागृहाचे आभार मानतो. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठामध्ये बोली भाषा वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून विद्यापीठाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील. बहिणाबाई चौधरींनी त्यांच्या कवितेमधून जो माणूस अपेक्षित होता तो या विद्यापीठाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ११ ऑगस्ट रोजी बहिणाबाईंची जयंती असते. त्या दिवशी विद्यापीठाचा नामविस्तार कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला जाईल. या विद्यापीठात बहिणाबाई चौधरींच्या नावे अध्यासन सुरु करण्याबाबत विचार केला जाईल, असेही  तावडे यांनी यावेळी सांगितले.

Previous articleखड्डयांमुळे झालेले मृत्यू हे महापालिका आणि राज्य शासनाने केलेले खूनच
Next articleकाल रात्री सव्वा बाराला कामकाज संपले आणि सुरू झाले ठिय्या आंदोलन