शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत वादंग

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत वादंग

आ.भातखळकर यांच्या वक्तव्यावरून गोंधळ

नागपूर : अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवरून आज विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले. काँग्रेसचे सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे शिवस्मारकाच्या उंचीचा विषय उपस्थित केला असता भाजपाचे सदस्य अतुल भातखळकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून सभागृहात रणकंदन माजले.अखेर भातखळकर यांना समज देण्यात आल्यानंतर या वादावर पडदा पडला.

काॅग्रेसचे सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे अरबी समुद्रातील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात येवून त्याऐवजी तलवारीची उंची वाढविण्याची सरकारची योजना असल्याचे सभागृहात सांगून छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा कोणताही अधिकार सरकारला नाही अशी टीका चव्हाण यांनी करत याप्रकरणी सरकारने खुलासा करावा अशी मागणी केली.भाजपचे सदस्य अतुल भातखळकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत विरोधक असले भलते सलते मुद्दे उपस्थित करतात, असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभागृहात एकच गोंधळ केला.भातखळकर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत सरकार पुतळ्याची उंची जाणून बुजून कमी करत असल्याचा आरोप करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी सत्ताधारी  सदस्यही अध्यक्षांकडील मोकळ्या जागेकडे धावत विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी करू लागले. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले.सभागृहातील गोंधळाचे वातावरण पाहून भातखळकर यांनी आपले शब्द मागे घेतले. परंतु वेलमध्ये धाव घेतलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी भातखळकरांच्या निलंबनाची मागणी लावून धरत सभागृह दणाणून सोडले. अखेर भातखळकर यांनी सभागृहाची माफी मागितल्यानंतर या वादावर पडदा पडला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी हे मनुवादी विचारांचे असल्याने त्यांच्याकडून महाराजांबद्दल अशा पध्दतीचे शब्द वापरले जात असल्याचे सांगितले.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांच्या शब्दावर हरकत घेत त्यांनी वापरलेला मनुवादी शब्द कामकाजातून काढून टाकावा अशी मागणी केली.भातखळकर यांच्या वक्तव्यावरून जोरदार गोंधळ सुरू असताना शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी याप्रश्नी भातखळकर यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात येताच शिवसेनेच्या सदस्यांनी महाराज हे महाराष्ट्राबरोबरच देशाचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांचा सर्वात मोठा पुतळा उभारलाच पाहिजे. तसेच महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भातखळकर यांनी सभागृहाची आणि राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली.त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांबरोबर शिवसेनेचे सदस्यही अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेकडे जात असताना त्यांना रोखण्यासाठी भाजपाचे सदस्य योगेश सागर हे त्यांच्या जागेवरून खाली आले. त्यामुळे सभागृहात शिवसेना सदस्यांच्या विरोधात भाजपा सदस्य असे पुन्हा चित्र दिसले. त्यात सागर हे शिवसेनेच्या आमदारांवर धावून गेले. मात्र प्रसंगावधान साधत गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, महादेव जानकर, सुनिल प्रभू यांनी शिवसेनेच्या सदस्यांना रोखले.

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे करण्यात येणाऱ्या स्मारकात जगातील सर्वात उंच पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल. पुतळ्याची उंची कमी केली नाही. हे स्मारक पूर्ण करण्याकरिता जेवढा निधी लागेल तेवढा राज्य शासन देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पहिल्यांदा केवळ संकल्प चित्र पाठविण्यात आले होते तो प्रस्ताव नव्हता. हा पुतळा समुद्रात उभारण्यात येणार असल्याने पुतळ्याचे डिझाईन करताना समुद्रातील वारे, लाटा यांचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे. समुद्रात हवेचा दाब सहन करून पुतळा असावा अशा पद्धतीने त्याचा आराखडा केला आहे. पुतळ्याची उंची कमी केली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Previous articleरत्नाकर गुट्टे हा महाराष्ट्रातील छोटा नीरव मोदी : मुंडे
Next articleमलकापूर नगरपरिषद, चंदगड व गारगोटी नगरपंचायत प्रस्तावाबाबत चार आठवड्यात निर्णय