पंकजा मुंडे यांच्या कामाची केंद्रीय मंत्री मेनका गांधींनी केली प्रशंसा

पंकजा मुंडे यांच्या कामाची केंद्रीय मंत्री मेनका गांधींनी केली प्रशंसा

महिला बालविकास विभागाच्या विविध योजनांचे दिल्लीच्या मंत्री परिषदेत सादरीकरण

मुंबई :  राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजा मुंडे यांनी आज नवी दिल्ली येथे पार पडलेल्या सर्व राज्यांच्या महिला बालविकास मंत्र्यांच्या परिषदेत महिला बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. केंद्रीय महिला बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी महाराष्ट्रातील सर्व योजनांचे कौतुक करून पंकजा मुंडे यांच्या कामाची प्रशंसा केली.

केंद्रीय महिला बालविकास मंत्री मेनका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिल्लीतील लि-मेरेडिअन हाॅटेल येथे विविध राज्यांच्या महिला बालविकास मंत्र्यांची बैठक पार पडली. बैठकीस उपस्थित राहण्यासाठी  पंकजा मुंडे सकाळीच नागपूरहून दिल्लीला रवाना झाल्या होत्या. महिला व बालकांचा सर्वांगिण विकास व्हावा या हेतूने विभागाच्या वतीने सध्या महाराष्ट्रात विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत. पंकजा मुंडे यांनी या बैठकीत प्रामुख्याने अनाथ बालकांचे आरक्षण, ग्रामीण भागातील मुलींना बचतगटाच्या माध्यमातून पांच रूपयांत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारी अस्मिता योजना, पोषण आहार, मुलींचा जन्मदर वाढीसाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’, शून्य टक्के दराने कर्ज आदी योजनांचे सादरीकरण केले. सदर योजना शहरांपासून ते वाडी, वस्ती तांड्यापर्यंत यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याबद्दल मेनका गांधी यांनी  पंकजा मुंडे व महिला बालविकास अधिका-यांचे कौतुक केले.

मंत्री परिषदेनंतर माध्यमांशी बोलताना  पंकजा मुंडे म्हणाल्या की, बैठक अतिशय चांगली झाली. विविध राज्यांमध्ये योजना कशा पध्दतीने राबविल्या जातात याची माहिती या अनुषंगाने मिळाली. आम्ही चांगले सादरीकरण केले. महिला बालविकास विभागाने विविध योजना राज्यात प्रभावी व पारदर्शकपणे राबवून जास्तीत जास्त शासकीय लाभ देण्याचा प्रयत्न केला असून चांगल्या कारभारामुळे महाराष्ट्राची मान देशात उंचावली असल्याचे त्या म्हणाल्या. बैठकीस महिला बालविकास सचिव विनिता सिंघल या ही उपस्थित होत्या.

Previous articleमलकापूर नगरपरिषद, चंदगड व गारगोटी नगरपंचायत प्रस्तावाबाबत चार आठवड्यात निर्णय
Next article“सब प्रभू की लिला है” : मुख्यमंत्री