मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेवून मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरची “वारी” टाळली
पंढरपुर : मराठा आरक्षणावर मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेवून आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर मध्ये होणाऱ्या विठ्ठलाच्या महापुजेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
मराठा समाजाच्या आरक्षणावरून आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणा-या महापुजेला मराठा समाजाने विरोध करत आज पंढरपुरच्या मार्गावर आंदोलन केले.याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आंदोलकांची भेट घेतली. मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेत महाजन यांनी आंदोलकांशी संवाद साधला.आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर मध्ये १५ लाखाच्या आसपास भाविक दाखल झाले आहेत. अशा वेळी त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा असून, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजात तीव्र भावना लक्षात घेवून येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुजेला न येण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती महाजन यांनी यावेळी दिली.