विठ्ठल पूजेला विरोध करणारे छत्रपतींचे मावळे होऊच शकत नाही : मुख्यमंत्री
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरमध्ये होणाऱ्या विठ्ठल पूजेला विरोध करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊच शकत नाहीत अशा शब्दात नाराजी व्यक्त करत वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महापुजेला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या महापूजेला विरोध करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊच शकत नाहीत. वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घेता यावे, ही राज्यातील जनतेचा आणि विठ्ठलाचा सेवक म्हणून माझी इच्छा आहे. पांडुरंगाच्या महापूजेचा पहिला मान हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला जातो. परंतु यावेळेस काही संघटनांनी मी पूजेला जाऊ नये, अशी भूमिका घेतलेली आहे. विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. परंतु पंढरपुर मध्ये वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा काही संघटनांचा प्रयत्न असल्याने १० लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने मी पंढरपुर मध्ये महापूजेला जाणार नाही असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाच्या आरक्षणसंदर्भात माझी भूमिका आंदोलकांच्या हिताचीच आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. सरकार त्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत ७२ हजारांची भरती रद्द करावी अशी काही संघटनांची भूमिका असल्याने मला महापूजा करण्यापासून रोखण्यात येत आहे. तसेच पंढरपुरात अनुचित प्रकार घडविण्याचाही या संघटनांचा डाव असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.