अवैध बांधकामे व अयोग्य हाताळणी
गेल्या काही दिवसांपासून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या तमाम लोकांच्या मदतीला यंदा वेळेत मान्सून धावून आला. पण, सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसाने लोकांच्या मनात चांगलीच धडकी भरवली. पावसाच्या दणक्यात शहरांची एवढी दयनीय अवस्था केली आहे की संपूर्ण आपत्कालीन व्यवस्थाही कोलमडून पडली. पावसाचे थैमान घालणे सुरूच आहे व त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा पूरही अजून कायम आहे.
या समस्यांचा उगम म्हणजे केवळ वरवर डागडूजी करून करण्यात येणारी कामे. अनेक वर्षांपासून पुरातन ड्रेनेज व्यवस्थेवरच आपण आजही अवलंबून आहोत. त्यातच शहरांमध्ये जागोजागी होत असलेली बेकायदेशीर बांधकामे, गटारे, रस्ते, नाल्यांना अडथळे निर्माण करीत आहेत. याआधी खाडीपासून धोधो वाहून जाणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यास जागाच राहिली नसल्याने ते पाणी आता रस्तांवर आले व शहराची अशी दैना झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पाणी वाहून जाण्याच्या मार्गात बेकायदेशीररीत्या केलेली बांधकामे व त्याची अयोग्य पद्धतीने केलेली हाताळणी हेच यामागील मुख्य कारण ठरावे. पाण्याचा योग्य निचरा होण्याकरिता लागणारी सक्षम यंत्रणाच निसल्यामुळे शहराची अशी दैना होत आहे. त्यातच मनुष्यबळ कमी आणि साधनांचीही कमतरता आहे. मुंबईची धमनी म्हटल्या जाणार्या रेल्वेमार्गावर साचलेल्या पाणातून जीव मुठीत घेऊन लोक कसेबसे आपले ठिकाण गाठत आहेत. अत्याधुनिक साधनांनीयुक्त शहर बनवताना या प्राथमिक गोष्टींकडेही लक्ष देणे तेवढेच गरजेचे असते आणि सर्वसामान्य जनतेची हीच माफक अपेक्षा असते.
पावसाळा तोंडावर असताना व शहरांमध्ये विकासकामे सुरू असताना प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली नाही. परिणामी, अवघ्या शहराची जागोजागी अशी दैना झाली आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सुनियोजित पूर्वतयारी केलेली असतानासुद्धा ती ऐनवेळी पूर्णपणे अपयशी कशी ठरते? दरवर्षी पावसाळ्यात पुन्हा त्याच त्या समस्यांचा प्रत्यय येतो, असे का व्हावे? तर अशा बिकट परिस्थितीत सुनियोजित व्यवस्था उभारण्यात आलेले अपयश हेच यामागील कारण ठरावे. त्याचा फटका अर्थातच शहरातील नागरी वस्तीला, पर्यायाने शहरातील नागरिकांना बसत आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यानंतरही शहरातील अनेक भागात डासांचा सुळसुळाट, तुंबलेले नाला, बंद पथदिवे, रस्तांवरील खड्डे व इतर नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत आणि नागरिकांना भेडसावणार्या या समस्या आता उग्र रूप धारण करीत आहेत. पावसाळा तोंडावर असताना व शहरांमध्ये विकासकामे सुरू असताना प्रशासनाने आवश्यक ती काळजी घ्यायलाच हवी, दैना टाळण्यासाठी शहरातील अवैध बांधकामे थांबवावी, दरवर्षी जीवानिशी जाणार्या लोकांबद्दल केवळ हळहळ व्यक्त करून हे प्रश्न सुटणार नाहीत, तर यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यावश्यक आहे.
संजीव पेंढरकर
( लेखक विको लेबाॅरेटरीजचे संचालक आहेत )