सगळ्या धर्मांना समान न्याय हवा : राज ठाकरे

सगळ्या धर्मांना समान न्याय हवा : राज ठाकरे

नवी मुंबई : गणपती मंडळासाठी जागा जर सरकार ठरवणार असले तर मग गणपती कपाटात बसवायचा का असा सवाल करीत सगळ्या धर्मांना समान न्याय हवा असा आक्रमक पवित्रा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेत रस्त्यावरचे नमाज का बंद होत नाहीत, भोंगे का उतरत नाहीत असा सवाल आज उपस्थित केला.

नवी मुंबईतील मनसे कर्मचारी मेळाव्यालाशसंबोधित करताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकावर निशाणा साधला.सरकार कोटीच्या कोटींच्या घोषणा करते,मग देशातील रिक्त जागा का भरत नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी करीत देशात २४ लाख जागा रिक्त असल्याचे सांगितले.याचाच अर्थ सरकार काम करत नाही, सरकारकडे पैसै नाहीत किंवा सरकारची या जागा भरण्याची इच्छा नाही, असे ठाकरे म्हणाले.

१० लाख शिक्षकांच्या, ५ लाख ४० हजार पोलिसांच्या २ लाख २० हजार अंगणवाडी सेविकांच्या जागा रिक्त असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. सरकार केवळ घोषणाच करत आहे. काम काहीही नाही. असे सांगतानाच नवी मुंबईसाठी ५० हजार कोटी देण्याची घोषणा करतो, असा उपरोधात्मक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. सरकारच गणपती मंडळासाठी जागा ठरवणार असले तर, मग गणपती काय कपाटात बसवायचा का? सगळ्या धर्मांना समान न्याय हवा असे सांगतानाच रस्त्यावरचे नमाज का बंद होत नाहीत, भोंगे का उतरत नाहीत असा आक्रमक पवित्राही राज ठाकरे यांनी घेतला.

राज ठाकरे यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे

महानगरपालिका कर्मचारी मेळाव्याला जमलेले सर्व कर्मचारी हे महाराष्ट्राचे नागरिक आहेत, आणि महाराष्ट्रातील शहरं राखणं ही तुमची जबाबदारी आहेत.

तुमच्या डोळ्यासमोर महापालिकेचे भूखंड लाटले गेले, तेंव्हा माझा मराठी कर्मचारी काय करतोय असा प्रश्न पडतो.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार, देशभरात एकूण २४ लाख जागा भरल्याचा नाहीत, ह्याचा अर्थ एकतर जागा भरायला सरकारकडे पैसे नाहीत, किंवा खाजगी कंत्राटदारांचे खिसे भरायचेत.

सरकारने अनेक जागा भरलेल्या नाही, साहजिकच गुन्ह्यांमध्ये वाढ. आरक्षणासाठी टाहो फोडला जातोय, मात्र तरीही सरकार कोणतीही भूमिका घेत नाही.

जर सरकारी नवीन नोकऱ्या निर्माण होणार नसतील, तर आरक्षण मिळून देखील काय फायदा? नोकऱ्याच नसतील तर आरक्षणाचा काय उपयोग होणार? आणि आधीचे असो की आत्ताच सरकार असो हे फक्त आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करत आहेत.

मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरु आहे, त्यात जवळपास ७५०० मराठी मुलांवर कलम ३०७ च्या खाली गुन्हे दाखल झालंय. म्हणजे समजा उद्या आरक्षण दिलंच तर ह्या मुलांच्या नावावर गुन्हे आहेत म्हणून त्यांना नोकरी मिळणार नाही.

मराठी मुलांची मनं भडकवायची, त्यांना रस्त्यावर उतरवायचं, त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार, आणि त्यांचं आयुष्य उध्वस्त होणार हे किती काळ चालणार आहे.

आरक्षणासाठीच्या आंदोलनात परप्रांतियांचा सहभाग, नाव मराठा समाजाचं खराब होतंय. आंदोलन करताना महाराष्ट्र बदनाम होऊ देऊ नका.

वाशीत आरक्षणाच्या नावाखाली जी आंदोलनं झाली त्यात ५६ मराठी मुलांवर केसेस दाखल झाल्या, आणि इतर परप्रांतीय मुलं होती. मराठी मुलांना त्यांचं हक्क मिळायलाच हवा पण त्यासाठी बाहेरची मनगटं नको.

राज्यकर्ते कोट्यवधींचं आमिष दाखवून जनतेची फसवणूक करत आहेत.

हे आत्ता आलेलं नरेंद्र मोदींचं सरकार, सगळं सुरळीत होतं, नको तिथे हात घालत बसले. नोटबंदीमुळे साडेतीन कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, मात्र सरकार यावर मौन बाळगून आहे.

महत्त्वाच्या मुद्यांवर लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान मोदी योगा करतात आणि योगा करुन झाला की परदेशात जातात.

जगात जी साम्राज्य उभी राहिली त्यात अगदी शेवटच्या माणसाने देखील काही ना काही भूमिका बजावली आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवायची असेल तर तुम्ही लक्ष ठेवायला हवं. महापालिकेचे भूखंड जर कोणी लाटत असतील तर तुम्ही कर्मचाऱ्यांनी आम्हाला येऊन सांगायला हवं.

मी जे करतोय ते मराठी माणसासाठी करतोय, तसंच तुम्ही महाराष्ट्रासाठी, मराठी मुला-मुलींसाठी, महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीसाठी जर तुम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणून पहारेकरी म्हणून काम करणार असाल तर तुमच्या संघटनेच्या कामात मी स्वत: लक्ष घालेन.

आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांचे जसे मोहल्ले उभे राहिलेत तसे मोहल्ले महाराष्ट्रात पण उभे आहेत आणि ह्याला कारण महापालिकेचे भूखंड बळकावले जातात, त्यावर वस्त्या उभ्या केल्या जातात आणि नंतर त्यावर SRA आणलं जातं. ह्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला अंदाज नाहीये की आपण कोणत्या सुरुंगावर बसलोय ते.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फक्त पगार मिळतोय किंवा वेतन आयोग लागू होतोय ह्याकडे लक्ष ठेऊन कामं करू नका. तुमचं आजूबाजूच्या परिस्थितीकडे लक्ष असायला हवं.

गणेश मंडळावर बंधनं लादली जात आहेत, गणपती काय कपाटात बसवायचे का? गणेश मंडळावर बंधनं लादता, आम्हाला सायलेंस झोन शिकवता मग रस्त्यावरचं नमाज, मशिदीवरचे भोंगे पण बंद करा. सर्व धर्मांसाठी समान नियम लागू करा, मराठी सणांवरच सरकारचे निर्बंध का?

कोण कुठचा अमित शाह, नरेंद्र मोदींच्या कृपेने राष्ट्रीय अध्यक्ष झालेला, किती ती चेहऱ्यावर गुर्मी. अमित शाह यांच्या बँकेत मोठा घोटाळा, मात्र वेगळ्याच गोष्टी जनतेसमोर ठेवून त्यांना हे विसरायला भाग पाडलं.

सरकारकडून प्रसार माध्यमांची गळचेपी, एबीपी माझा आणि एबीपी न्यूजच्या प्रसारणात मुद्दाम व्यत्यय आणला जातोय, कारण ते भाजपविरोधी बातम्या दाखवतात. सरकार माध्यमांना दाबायचा प्रयत्न करतंय, वृत्तवाहिन्यांच प्रक्षेपण रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. वर्तमानपत्रांना, माध्यमांना विनंती आहे की तुम्ही वस्तुस्थिती दाखवा.

Previous articleमुख्यमंत्री आज जनतेशी थेट संवाद साधणार
Next articleमराठा आरक्षणापर्यंत मेगा भरतीला स्थगिती : मुख्यमंत्री