मुंबईत उद्या बंद ऐवजी ठिय्या आंदोलन; यंत्रणा दक्ष

मुंबईत उद्या बंद ऐवजी ठिय्या आंदोलन; यंत्रणा दक्ष

मुख्य सचिवांनी घेतला कायदा सुव्यवस्थेचा आढावा

मुंबई :मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतील समन्वयकांनी उद्या बंद ऐवजी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा मोर्चाच्यावतीने उद्या वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

शिवाजी मंदिर येथे झालेल्या बैठकीत उद्या मुंबई बंद न ठेवता केवळ ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्याच्या आंदोलनात कोणतीही हिंसा न करता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, उद्या होणा-या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी आज पोलिस, वाहतूक, रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुरक्षेचा आढावा घेत बंद काळात कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये याकरिता यंत्रणांनी अधिक दक्षता घ्यावी, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.

मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात यासंदर्भात आढावा बैठक झाली. बंद काळात संपूर्ण राज्यभरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्याबरोबरच शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील यासाठी प्रयत्न करावे. एसटी बस सेवा त्याचबरोबर मुंबईत बेस्टची बस सेवा सुरळीत सुरु राहण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असेही मुख्य सचिवांनी सांगितले. शाळा-महाविद्यालयांना आवश्यक ती सुरक्षा देतांनाच या काळात असलेल्या परिक्षा व्यवस्थीत पार पडतील याची काळजी घ्यावी. बंद काळात रेल्वे सेवा सुरु राहील याची दक्षता रेल्वे सुरक्षा दलाने घ्यावी. सर्वच यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून बंद काळात आवश्यक त्या सेवांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.

बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, मुंबई पोलिस आयुक्त सुबोध कुमार जैसवाल यांच्यासह मुंबई महापालिका, बेस्ट, राज्य महामंडळ, रेल्वे, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Previous article१५ नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करणार
Next articleठोस आश्वासनामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे