‘सनातनवरील बंदी’ची मागणी खोडसाळपणाची

‘सनातनवरील बंदी’ची मागणी खोडसाळपणाची

मुंबई : काल अटक करण्यात आलेले हिंदुत्ववादी वैभव राऊत हे सनातनचे साधक नाहीत; मात्र ते हिंदुत्ववादी संघटनांच्या अनेक आंदोलनांमध्ये सहभागी असत. जरी ते सनातनचे साधक नसले, तरी हिंदुत्वासाठी कार्य करणारा, धर्मासाठी कार्य करणारा कोणताही हिंदु कार्यकर्ता हा सनातनचाच आहे, असे आम्ही मानतो. आता वैभव राऊत यांना केवळ अटक झाल्यावर कोणतेही पुरावे सादर होण्यापूर्वी, चौकशीही पूर्ण होण्याआधी, न्यायालयात आरोप सिद्ध झालेला नसताना ‘सनातनवर बंदी घाला’, अशी उतावळी मागणी होत आहे.ही मागणी खोडसाळपणाची असल्याची प्रतिक्रिया सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी व्यक्त केली आहे.

देशात लोकशाही आणि न्यायालय अजून शिल्लक आहेत, हे नेते विसरले की काय, असा प्रश्‍न पडला आहे. शिखांच्या कत्तली करणारे आणि आणीबाणीत विरोधी पक्ष आणि माध्यमे यांच्यावर कारवाई करणारे पुन्हा तशीच बंदी सनातनवर लादू पहात आहेत. पुरोगामीही ‘सनातनवरील बंदी’ची मागणी करत आहेत, ही मागणी खोडसाळपणाची आहे असे सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस म्हणाले.

वैभव राऊत यांच्यावर काय वेळ आली आहे, हे सनातन संस्था समजू शकते. निष्पाप असतांना बॉम्बस्फोटासारख्या विषयात गोवल्यावर काय होते, हे सनातनने अनुभवले आहे. सनातनला यापूर्वी मडगाव बॉम्बस्फोटामध्ये नाहक गोवण्याचा प्रयत्न झाला. नंतर सनातनच्या साधकांची निर्दोष मुक्तताही झाली. सनातनला दाभोलकर-पानसरे प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाला; पण आता ५ वर्षे होत आली, तरी दाभोलकर कुटुंबीय न्यायालयात खटलाच चालू नये, यासाठी प्रयत्न करत आहेत. सनातनने नेहमी संविधानिक मार्गाने प्रभावीपणे धर्माचे कार्य केले आहे, त्यामुळेच धर्मविरोधी लोकांना सनातनविषयी पोटशूळ उठला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जर हिंदुत्ववाद्यांच्या घरात एटीएसचे अधिकारी आरडीएक्स ठेवू शकतात, असेच वैभव राऊत यांच्या बाबतीत झाले नसेल कशावरून? अजून कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे आताच त्यांना दोषी मानणे धाडसाचे ठरेल असेही सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी म्हटले आहे.

Previous articleसनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषीत करा
Next articleतपासानंतरच वैभव राऊतचे सनातनशी संबंध आहे की नाही सिद्ध होईल