शिवसेना लोकसभेच्या सर्व जागा लढविणार

शिवसेना लोकसभेच्या सर्व जागा लढविणार

मुंबई  :  एकला चलो रे चा नारा देणा-या शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणूकीत सर्वच्या सर्व ४८ मतदार संघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.शिवसेनेच्या विद्यमान खासदरांना पुन्हा संधी देवून उर्वरीत जागांवर नव्या चेह-यांना संधी दिली जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकीची रणनिती ठरविण्यासाठी शिवसेनेची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय घेतल्याचे समजते.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पक्षबांधणी आणि रणनीती ठरविण्यासाठी शिवसेना भवनात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुंबईतील खासदार, आमदार आणि  महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वच राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणूकांच्या तयारीला सुरूवात केली असतानाच ‘एकला चलो रे’चा नारा देणा-या शिवसेनेनेही आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणीला सुरूवात केली आहे. आज झालेल्या बैठकीत मुंबईसह राज्यातील सर्व लोकसभा मतदार संघांचा  आढावा घेतल्याचे समजते. त्यानुसार सर्वच्या सर्व ४८ जागा शिवसेना स्वबळावर लढणार आहे. शिवसेनेच्या विद्यमान 18 खासदारांना पुन्हा संधी देण्यात येवून, उर्वरीत जागांवर नव्या चेह-यांना संधी दिली जाईल. शिवसेनेने मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रीत करून भाजपच्या ताब्यात असणारे मतदार संघ भाजपकडून कसे हिसकावून घेता येईल यासाठी विशेष रणनिती ठरविली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर त्यांचे मन वळविण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची मातोश्रीवर जावून भेट घेतली होती तर भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी नुकतीच मातोश्रीवर उध्दव ठाकरेंची भेट घेतली होती.

शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेकडून अनेक नव्या चेह-यांना संधी दिली जावू शकते त्यानुसार मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी महापौर शुभा राऊळ, आ. नीलम गोऱ्हे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. आज झालेल्या बैठकीत मुंबईतील लोकसभा मतदार संघातील खासदार, आमदार,  पदाधिकारी, आणि नगरसेवकांना शिवसेना पक्ष प्रमख उध्दव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

Previous articleया सरकारचं करायचं काय…खाली डोकं वर पाय..!
Next articleउध्दव ठाकरे भुजबळांना काय म्हणाले ?