राज्यात चर्मकार आयोग स्थापन करणार

राज्यात चर्मकार आयोग स्थापन करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई: राज्यातील चर्मकार समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी लवकरच राज्यात चर्मकार आयोग स्थापन करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

रोहिदास समाज पंचायत समाज संघाच्या वतीने परळ येथे उभारण्यात येत असलेल्या संत रोहिदास भवन भूमिपूजन आणि कोनशीलेचे उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, आमदार भाई गिरकर, अजय चौधरी, मंगेश कुडाळकर यांच्यासह माजी महापौर महादेव देवळे, स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, चर्मकार समाजाच्या सर्व अडचणी या आयोगाच्या माध्यमातून सोडवल्या जातील. त्यामुळे समाजाचा योग्य विकास साधण्याचे काम आयोगाच्या माध्यमातून केले जाईल असा विश्वास व्यक्त केला. संत रोहिदास यांच्या विचार, आचार आणि कार्याला समर्पित असे हे स्मारक उभे होत आहे. देशात रोहिदास यांनी समतेची परंपरा सुरू केली. समाजात कोणीही मोठा अथवा लहान न मानता समाज एकत्र केला. त्यांनीच देशात आपल्या काव्यातून सबका साथ सबका विकास हा संदेश दिला होता. समताधिष्ठित राज्याचा त्यांचा विचार होता त्याच विचारावर आपले सरकार चालत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. या भवनासाठी सरकारने ११ कोटी रुपये दिले असले तरी त्यानंतरही काही कमी पडल्यास सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी परळ येथे उभे राहत असलेल्या या भवनात वसतिगृह, वाचनालय, कौशल्य विकास कार्यक्रम आदी अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देत अशाच प्रकारे राज्यातील प्रत्येक विभागात संत रोहिदास भवन उभे करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. यासाठी अनेकांनी दिलेली निवेदन आपल्याकडे आले असून त्यासाठीचा निर्णय भविष्यात घेतला जाईल, असेही बडोले यांनी सांगितले.

बडोले पुढे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेत गटई कामगारांनी स्टॉलसाठी आत्तापर्यंत केलेल्या सर्व अर्जांवर कार्यवाही करण्यात येईल.मुंबई महापालिकेने गटई स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही येत्या दोन महिन्यात केली जाईल, असेही ते म्हणाले. तसेच सर्वच महामंडळांचे भागभांडवल वाढविण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून, या बैठकीत वित्तमंत्र्याना सदर भागभांडवल वाढविण्यासाठीचे निर्देश दिले आहेत अशी माहिती बडोले यांनी यावेळी दिली.

Previous articleराज्य सरकार बांधकामांवरील बंदी उठवण्याची विनंती करणार
Next articleमागाठाण्यात साजरा होणार व्यसनमुक्ती आणि प्लास्टिक थर्मोकोल मुक्तीचा दहीकाला महोत्सव