हा माझा लढा ; संघर्षाची वज्रमुठ कायम ठेवा : पंकजाताई मुंडे
ऊसतोड मजूरांच्या मागण्या लवादाच्या बैठकीत प्राधान्याने मांडणार
राज्यस्तरीय मेळाव्यातून ऊसतोड मजूरांना दिली ताकद
बीड : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून दिला, त्यांच्या पश्चात आता मी ऊसतोड मजूरांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, ऊसतोड मजूरांची नेता म्हणून येत्या ४ तारखेला होणा-या लवादाच्या बैठकीत ऊसतोड कामगारांचे प्रश्न प्राधान्याने मांडून ते सोडवून घेवू असा विश्वास देत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज झालेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात ऊसतोड मजूरांना हा लढा तुमचा नसून माझा आहे, संघर्षाची वज्रमुठ कायम ठेवा असे आवाहन केले.
गोपीनाथराव मुंडे साहेब ऊसतोडणी मजूर, मुकादम व वाहतूक संघटनेच्या वतीने आशीर्वाद लाॅन्स येथे आज झालेल्या ऊसतोड मजूरांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. खासदार डाॅ प्रितमताई मुंडे, आ. भीमराव धोंडे, आ. आर टी देशमुख, आ. सुरेश धस, आ. संगीता ठोंबरे, आ. मोनिका राजळे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, जि. प अध्यक्षा सविता गोल्हार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, संतोष हंगे यांच्यासह संघटनेचे मार्गदर्शक माजी आमदार केशवराव आंधळे, अध्यक्ष श्रीमंत जायभाये, गोरक्ष रसाळ, संजय तिडके, सुरेश वनवे, दत्तोबा भांगे, बाबासाहेब बांगर, सुखदेव सानप, राणा डोईफोडे, सर्जेराव डोईफोडे, देविदास तोंडे, रामहारी दराडे, महादेव बडे, सर्जेराव वाघमोडे, अशोक बडे, तात्यासाहेब हूले, विष्णुपंत जायभाये, कृष्णा तिडके, प्रविण बांगर, संपत सोनवणे, बाबुराव केदार, पिराजी किर्तने, भाऊसाहेब आंधळे, वंसत गिते, भारत राठोड, चंद्रकांत तोंडे, उध्दव दराडे, कृष्णा कराड, बापु चाटे, प्रमोद तिडके, आदी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, मेळाव्याला जागा अपूरी पडल्याने कोणाला छतावर, कोणाला खिडक्यात उभारुन भाषण ऐकावे लागत आहे. जागेचा अंदाज आला नाही. मात्र, माझ्या बाबतीत सर्वच अंदाज चुकीचे ठरत आहेत, देव करो असेच अंदाज चुकीचे ठरत जावोत आणि तुमचे प्रेम मला मिळत राहो असे त्या म्हणाल्या. “दिवंगत गोपीनाथराव मुंडेंनंतर ही पोरगी काय करणार, मुलगी वारसा असते का, असे प्रश्न विचारले जात होते. पण, सर्वांचे अंदाज चुकले. दिवंगत मुंडेंनी हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या त्यांच्या मुलीला तुम्ही मायेच्या पदराआड घेतले,” असेही त्या म्हणाल्या.
ऊसतोड मजूरांची साथ असल्यानेच माझ्या आवाजाला कोयत्याची धार आहे. दिवंगत मुंडेंच्या जागी साखर संघावर लवाद म्हणून मिळालेली नेमणूक हे माझ्यासाठी सर्वाच्च पद आहे. यापुढे लाल दिवा व इतर पदे फिकी आहेत.” ऊन, वारा, वादळात संघर्ष करणाऱ्या ऊसतोड कामगारांसाठी आपणही ऊन, वारा व वादळाची तमा न बाळगता तुमच्या सोबत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. दिवंगत मुंडेंनंतर ऊसतोड कामगारांनी जी माया दिली त्याचे उपकार विसरता येणार नाहीत. तुमच्या पायाखाली कातडी अंथरली तरी उपकार फिटणार नाहीत असे त्या म्हणाल्या.
तर आपणही कोयता हातात घेवू
संघटनेच्या मागण्या न्याय असून त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, आपणही कोयता घेऊन तुमच्या सोबत असू असेही पंकजाताई मुंडे यांनी उपस्थितांना सांगितले. गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळ दसऱ्यापूर्वी कार्यान्वित होईल. मजूरांच्या घरकुल योजनेसाठी प्रयत्न करणार आहे. आगामी दसरा मेळावा सावगाव घाट (ता. पाटोदा) येथेच होणार असून याला उपस्थितीसाठी त्यांनी साद देताच मोठा प्रतिसाद मिळाला.
खा.डॉ.प्रितमताई मुंडे
लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पश्चाात होणारा हा ऊसतोड मजुरांचा पाहिलाच मेळावा आहे. तुम्हाला जेवढी साहेबांची कमतरता जाणवत आहे तितकीच आम्हाला जाणवत आहे. ऊसतोड मजुराच्या हातातील कोयता जाऊन त्यांच्या हातात लेखणी यावी हे स्वप्न स्व.साहेबांनी पाहिले ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी आम्ही छोटाशा प्रयत्न करत आहोत. साहेबांवर जेवढे प्रेम तुम्ही केले, जेवढी साथ तुम्ही दिली तिच साथ आणि तेच प्रेम तुम्ही ना.पंकजाताई यांच्या नेतृत्वावर विश्वातस ठेवून करत आहात. तुमचे हे प्रेम आशिर्वाद असेच कायम पाठिशी राहू द्या असे खा.डॉ.प्रितमताई म्हणाल्या.
क्षणचित्रं
• लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून मेळाव्यास सुरुवात करण्यात आली.
• ना.पंकजाताई मुंडे आणि खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचा फेटा, कोयता आणि ऊसाची मोळी देवून सत्कार करण्यात आला.
• मी पोचत नसले तरी माझा आवाज तुमच्या पर्यंत पोचत आहे’ …पोचतोय का? असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणताच उपस्थितांतून ‘हो….’असा प्रतिसाद आला. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे सभेत असेच म्हणायचे, अशी आठवणही पंकजा मुंडे यांनी काढली.
• भोगलवाडी येथील बालासाहेब रामभाऊ तिडके हा ऊसतोड मजूराच्या मुलगा एमबीबीएस परिक्षा उत्तीर्ण होऊन डाॅक्टर झाला त्याबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने त्याला एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली.
• कार्यक्रमाचे प्रस्ताविक गोरक्ष रसाळ यांनी केले तर माजी आ. केशवराव आंधळे यांनी ऊसतोड मजूरांच्या मागण्या यावेळी मांडल्या.
• मेळाव्यास राज्याच्या काना कोप-यातून ऊसतोड मजूर एवढ्या प्रचंड संख्येने आले होते की, मैदान अपुरे पडले. जिथे जमेल तिथे उभा राहून त्यांनी भाषण ऐकले