काँग्रेसच्या भारत बंदला मनसे आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा

काँग्रेसच्या भारत बंदला मनसे आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा

मुंबई : पेट्रोल, डिझेलची केंद्र सरकारने केलेली प्रचंड दरवाढ आणि गगनाला भिडलेल्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसने उद्या सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. त्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणि राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला असून,या बंद मध्ये सक्रिय सहभाग दर्शविला आहे. काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पक्ष आदी पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.

पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर आणि गगनाला भिडलेली महागाई,याचा निषेध म्हणून काँग्रेसने उद्या सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे सरचिटणीस, उपाध्यक्ष व विभाग अध्यक्षांची महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी मनसे उद्या पूर्णपणे या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.उद्याच्या बंद मध्ये पूर्ण ताकदीने सामील व्हा पण सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने देखिल उद्याच्या भारत बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे.इंधन दरवाढीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करायचा आहे.या देशव्यापी बंद मध्ये सहभागी होऊन कडकडीत बंद पाळावा असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार आणि पदाधिका-यांना आवाहन केले आहे.

केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या आणि केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनाला उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई काँग्रेसने संजय निरुपम यांनी केले. शिवसेनेने बंदमध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण शिवसेनेच्या नेत्यांशी बोलणार आहेत, अशी माहिती निरुपम यांनी दिली आहे.

Previous articleएका दिवसासाठी भाजपचे नेते व्हा…मग कळेल !
Next articleमहाराष्ट्राला मनरेगाचे ४ पुरस्कार; राज्याच्या योजनांची राष्ट्रीय पातळीवर दखल