महाराष्ट्राला मनरेगाचे ४ पुरस्कार; राज्याच्या योजनांची राष्ट्रीय पातळीवर दखल

महाराष्ट्राला मनरेगाचे ४ पुरस्कार; राज्याच्या योजनांची राष्ट्रीय पातळीवर दखल

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणा-या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार- २०१८’ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. विशेषत: मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्ग झालेल्या रोजगार निर्मितीची खास दखल घेण्यात आली आहे.

मंगळवार दिनांक ११ सप्टेंबर २०१८ रोजी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी महाराष्ट्राला राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

रोजगार हमी योजना विभागाने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये नैसर्गीक स्त्रोतांचे व्यवस्थापनांतर्गत(एनआरएम) एकूण ७० हजार ५१४ कामे पूर्ण केली आहेत व यासाठी १४५१.७४ कोटींचा व्यय झाला आहे. एनआरएम अंतर्गत राज्य शासनाची महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली व यामाध्यमातून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. या विभागाने एनआरएमच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला नकाशे पुरविले आहेत आहेत. राज्याच्या रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह मनरेगा आयुक्त आदी वरिष्ठ अधिकारी हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

मनरेगा अंतर्गत गडचिरोली सर्वोत्तम

गडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोउत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे. गडचिरोलीचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नाईक यांच्या कुशल नेतृत्वात आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ८ हजार ८९४ कामांना सुरुवात झाली यातून ३९.१२ लाख मानवी दिनाची निर्मिती झाली. विदयमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या नेतृत्वात या आदिवासी बहुल जिल्हयामध्ये मनरेगाअंतर्गत वैयक्तीकामांवर भर देण्यात आला आहे आतापर्यंत जिल्हयात शेततळे, सिंचन विहीर, वर्मी कंपोस्ट आदी ६ हजार ७५० कामे पूर्ण झाली आहेत व यातून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. मनरेगा पुरस्काराचा बहुमान मिळविणा-या गडचिरोलीचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नाईक आणि विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना मनरेगा पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

मनरेगा अंमलबजावणीत नागरी ग्रामपंचायत सर्वोत्तम

मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी गडचिरोली जिल्हयातीलच गडचिरोली ब्लॉक मधील नागरी ग्रामपंचायतीची सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून निवड झाली आहे. सरपंच अजय मशाखेत्री यांच्या नेतृत्वामुळे ग्रामपंचायतीने एनआरएमची कामे हाती घेतली व लवकरच एनआरएमची ३८ कामे पूर्णत्वास नेली यामाध्यमातून गावात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. सरपंच अजय मशाखेत्री आणि ग्रामसेवक राकेश शिवणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

श्रीमती नूतन प्रकाश यांना उत्कृष्ट डाकसेवक पुरस्कार

ठाणे जिल्हयातील खुटाघर येथील ग्राम डाकसेवक श्रीमती नुतक प्रकाश यांची मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीकरिता केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यातील सर्वोत्तम ग्राम डाकसेवक म्हणून निवड झाली आहे. त्यांनी या भागातील कामगारांना मनरेगा अंतर्गत विविध कामे व योजनांची माहिती दिली व या भागात मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी कामगारही उपलब्ध करून दिले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.

Previous articleकाँग्रेसच्या भारत बंदला मनसे आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा
Next articleछत्रपती व रायगडच्या नावलौकिकास साजेसं आदर्शवत काम करूया